डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जमणार राज्यातील कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी!

By रवी दामोदर | Published: June 5, 2024 07:16 PM2024-06-05T19:16:23+5:302024-06-05T19:16:36+5:30

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक अकोल्याला!

Meeting of the joint agricultural research and development committee of all four agricultural universities in the state is held in Akola | डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जमणार राज्यातील कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी!

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जमणार राज्यातील कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी!

अकोला :  हवामान बदलाच्या आणि जागतिक पीक उत्पादन तथा उत्पादकतेच्या पार्श्वभूमीवर  देशांतर्गत शेती क्षेत्राला बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना अधिक शाश्वत करण्याचे हेतूने महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृषि संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची ५२ वी त्रिदिवसीय बैठक दि.७ ते ९ जून दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. 

त्रिदिवसीय बैठकीदरम्यान महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांचा केंद्रबिंदू असलेल्या शेतकरी बांधवांसाठी व एकूणच कृषी क्षेत्राचे उत्थान आणि उर्जितावस्थेसाठी विविध फायदेशीर पिकांचे सुधारित वाणांचे आणि सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रांचे प्रसारण तसेच उपयुक्त अशा कृषी उत्पादन तंत्रज्ञानाच्या शिफारशींवर मान्यवरांद्वारे मंजुरी प्रदान करण्यात येणार आहे.

बैठकीचे नियोजन तीन तांत्रिक सत्रांमध्ये केले असून त्या अंतर्गत कृषी शास्त्र विषयक विविध १२ गटांचा समावेश करण्यात आला आहे. बैठकीचे प्रथम तांत्रिक सत्रामध्ये राज्यातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संशोधन संस्थांचे संचालक त्यांचे  उपलब्धींचे सादरीकरण करणार आहेत. सोबतच, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ  अकोला आणि  इतर तीनही कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक देखील त्यांच्या महत्वपूर्ण संशोधनात्मक उपलब्धीचे सादरीकरण करणार आहेत. बैठकीच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी समारोपीय कार्यक्रमांमध्ये उपरोक्त १२ तांत्रिक गटनिहाय मंजूर करण्यात आलेल्या शिफारसींचे वाचन होऊन सदर शिफारसींना अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या या तीन दिवसीय बैठकीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील सुमारे ३०० मान्यवर व शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.बैठकीच्या आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ विलास खर्चे यांच्या पुढाकारात विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे.

बैठकीत ३२० शिफारसींचे होणार सादरीकरण

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे नवीन पिक वाण, सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे तसेच उत्पादन तंत्रज्ञान शिफारसी मिळून एकत्रितपणे ८६ शिफारसी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीद्वारे ११५ शिफारसी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीद्वारे ५७ शिफारसी तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीद्वारे ४४ शिफारसी अशा एकूण ३०२ शिफारसींचे सादरीकरण संबंधित कृषी शास्त्रज्ञांद्वारे सभागृहातील मान्यवरांसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत.

Web Title: Meeting of the joint agricultural research and development committee of all four agricultural universities in the state is held in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.