सभेच्या सचिवांनीच संपवली सभा
By admin | Published: April 11, 2017 01:39 AM2017-04-11T01:39:19+5:302017-04-11T01:39:19+5:30
अकोला जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच झाला उफराटा प्रकार.
अकोला : जिल्हा परिषदेची कोणतीही सभा त्या सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने संपवली जाते. मात्र, सोमवारी आक्रित घडले. अर्थ समितीचे सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या समक्षच सभा संपल्याचे सांगत सभेच्या सचिव मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर सभागृहातून निघूनही गेल्या. त्यातून पदाधिकार्यांचे अधिकारही न जुमानण्याचा आणखी एक प्रताप जिल्हा परिषदेत घडला. त्यामुळे अवाक झालेल्या पदाधिकार्यांना तक्रारीशिवाय गत्यंतर उरले नाही.
अर्थ समितीची सभा सोमवारी बोलावण्यात आली. यावेळी विषयपत्रिकेवर गेल्या सभेचे इतवृत्त कायम करणे, हा विषयच नव्हता. ही बाब सदस्या रेणुका दातकर, ज्योत्स्ना बहाळे यांनी उपस्थित केली. त्यावर सभापती अरबट यांनी सभेच्या सचिव म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांना विचारणा केली. त्यावर गेल्या वर्षीच्या सभेतही हा विषय घेण्यात आला नव्हता, असे त्यांनी सांगितले.
विषय न ठेवण्याबाबत काही नियम आहे का, अशी विचारणा केली असता नागर यांनी इतवृत्त २३ मार्चच्या सभेत ठेवल्याने यावेळी ठेवले नाही, असे सांगितले. नागर यांच्या उत्तराने समाधान होत नाही, असे सांगत रेणुका दातकर यांनी त्यांना धारेवर धरले.
अनावधानाने चूक झाल्याचे मान्य
त्यामुळे नागर यांनी अनावधानाने ही चूक झाल्याचे मान्य केले. आता वेळेवरच्या विषयामध्ये इतवृत्त घेऊ, असेही सुचवले. मात्र, सभापती अरबट यांनी चूक झाली असेल, तर सभेच्या सचिवावर प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचे सांगितले. त्यामुळे विषय अंगलट येत असल्याचे दिसताच नागर यांची तारांबळ झाली.
सभा संपल्याचे सांगत बहिर्गमन
याप्रकाराने भांबावलेल्या नागर यांनी सभापतींची परवानगी न घेता स्वत:च सभा संपल्याचे सांगत सभागृहातून बहिर्गमन केले. त्यानंतर सभापती अरबट यांनी इतवृत्त नसल्याने सभा रद्द करून सात दिवसांच्या आत विषय नमूद करून सभा घेतली जाईल, तसेच सचिवावर कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला जाईल, अशी नोंद घेण्याचे संबंधितांना सांगितले.