ठिय्याऐवजी झाली बैठक, दाेन दिवसांत कचरा उचलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:18 AM2021-09-13T04:18:27+5:302021-09-13T04:18:27+5:30
अकाेला : शहरातील अनेक वाॅर्डांमध्ये कचरा तुंबला आहे या पृष्ठभूमीवर महापाैरांसह भाजप नगरसेवकांनी आयुक्तांच्या निवासस्थानी ठिय्या आंदाेलनाची ...
अकाेला : शहरातील अनेक वाॅर्डांमध्ये कचरा तुंबला आहे या पृष्ठभूमीवर महापाैरांसह भाजप नगरसेवकांनी आयुक्तांच्या निवासस्थानी ठिय्या आंदाेलनाची घाेषणा केली हाेती. ती घाेषणा सामंजस्याने मागे घेत आयुक्तांसाेबत महापाैरांच्या दालनात चर्चा करण्यात आली. रविवारी झालेल्या या चर्चेत शहरातील कचरा समस्येवर येत्या दाेन दिवसांत ताेडगा काढून कचरा उचलल्या जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
शहरातील केरकचरा जमा करून त्याची डंपिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यासाठी मनपा प्रशासनाने भाडेतत्त्वावर ३२ ट्रॅक्टर नियुक्त केले हाेते. कचरा संकलन करणाऱ्या पुरवठादाराला २००७ पासून सातत्याने मुदतवाढ दिली जात हाेती. मात्र, प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी थेट ट्रॅक्टरचा पुरवठादारासाेबतच करार रद्द केला. मात्र, पर्यायी व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत केली. त्यामुळे कचरा संकलन हाेऊ शकले नाही. परिणामी, सण उत्सवाच्या काळात अनेक वाॅर्डांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. सत्ताधारी भाजपने या प्रकारासाठी मनपा आयुक्तांना जबाबदार धरत त्यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदाेलन पुकारले हाेते. प्रशासनाने विनंती केल्यावर आंदाेलनाऐवजी महापाैर अर्चना मसने यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत प्रभागात ट्रॅक्टर, ट्रॅक्टरवरील कामगार, प्रभागातील स्वच्छता करणारे कर्मचारी, डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था, शहरातील गवतावर तणनाशकाची फवारणी करणे, शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, शहरातील विविध भागांत अस्वच्छता पसरविणाऱ्या वराहांचा बंदोबस्त करणे, शहरातील विविध भागातील बंद असलेल्या पथदिव्यांची व्यवस्था सुरळीत करणे, अमृत योजनेंतर्गत पाइपलाइन टाकणेच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, शहरातील सखल असलेल्या भागात मुरुमाची व्यवस्था करणे, जनता भाजी बाजार आणि शहरातील सर्व बाजारतील साचलेला कचरा उचलणे, हद्दवाढ भागातील साफ-सफाई करणे तसेच महावितरण कंपनीकडून विद्युत वाहिनीवरील तोडण्यात आलेले झाडे उचलणे आदींबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात प्रशासनास सूचना करण्यात आल्या. यावेळी मनपा आयुक्त नीमा अरोरा, माजी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर राजेंद्र गिरी, स्थायी समिती सभापती संजय बडोणे, तसेच भाजपचे नगरसेवक यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
...तर कचरा फेकणार
येत्या दोन दिवसांत मनपा प्रशासनाच्या कामात सुधारणा न झाल्यास व कचऱ्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास भाजपतर्फे आयुक्त यांच्या निवास्थानी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर कचरा फेकण्यात येईल, असा इशारा विजय अग्रवाल यांनी यावेळी दिला.