नोकरीची संधी... महाबीजमध्ये मेगा भरती, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा
By राजेश शेगोकार | Published: September 2, 2022 05:49 PM2022-09-02T17:49:07+5:302022-09-02T17:50:42+5:30
अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते बोलत होते.
अकोला: राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये आगामी काही दिवसात मेगा भरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते बोलत होते.
अकोल्यात राज्याचे मुख्यालय असलेल्या महाबीजची स्थापना २८ एप्रिल १९७६ रोजी झाली असून, बियाणे उत्पादन, प्रमाणिकरण, बियाणे गुणवत्ता नियंत्रण, बियाणे प्रक्रिया, हाताळणी, ‘पॅकेजिंग’, बियाणे विपणन, बियाणे विक्री आदी कामे महाबीजमध्ये होतात. यंदा महाबीजच्या बियाण्यांमध्ये मोठी तूट आढळून आली आहे. तसेच महाबीजमध्ये रिक्त असलेल्या जागांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. त्यासंदर्भात आता दिलासादायक बाब म्हणजे आगामी दिवसांत लवकर महाबीजमध्ये मेगा भरती राबविण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. यासंदर्भात अकोल्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह युवकांनाही दिलासा मिळणार आहे.
डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठात केली पाहणी
अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पाहणी केली. दरम्यान, सोयाबीनच्या विषयावरून विद्यापीठातील अधिकाऱ्यांना कृषीमंत्र्यांनी चांगलेच खडसावले. तसेच पीडीकेव्ही अंबा या सोयाबीन वाणची जिल्हातील वितरण व लागवडीची आकडेवारी सांगताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाल्याचे दिसून आले.