महापरीक्षा पोर्टलच्या गोंधळात मेगा भरती रखडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 10:52 AM2019-12-02T10:52:19+5:302019-12-02T10:52:30+5:30
महापरीक्षा पोर्टलने २४ आॅगस्ट २०१७ आणि २३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्यांमध्ये गोंधळ केला.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया गत आठ महिन्यांपासून रखडली आहे. त्यातच महायुतीच्या शासनाने नियुक्त केलेल्या महापरीक्षा पोर्टलने परीक्षेसाठी उमेदवारांना हजारो रुपये शुल्क आकारले. त्यातच संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात मोठे घोटाळे झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या. सत्तांतर झाल्याने आता महापरीक्षा पोर्टल वादात अडकण्याची चिन्हे आहेत.
महायुतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात ७२ हजार पदांची मेगा भरती करण्याची घोषणा केली होती. शासनाच्या सर्वच विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महापरीक्षा पोर्टल या संस्थेकडे काम देण्यात आले. या संस्थेने भरती प्रक्रियेत कमालीचा गोंधळ केल्याच्या तक्रारी गत वर्षभरात झाल्या आहेत.
महापरीक्षा पोर्टलने २४ आॅगस्ट २०१७ आणि २३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्यांमध्ये गोंधळ केला. त्यामुळे ३५ जिल्हा परिषदांतील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे उमेदवारांना भाग पाडले. त्यामुळे एकाच पदासाठी ३५ जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करण्याची संधी असलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी १७ हजार तर आरक्षित प्रवर्गासाठी १२,५०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागले. त्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेतील रिक्त पदासाठी एकाच दिवशी परीक्षा झाल्यास उमेदवारांना किती ठिकाणी परीक्षा द्यावी लागेल, याबाबतची माहितीही महापरीक्षा पोर्टलने कोणत्याही उमेदवाराला दिली नाही. आॅगस्ट २०१९ मध्ये परीक्षा नियोजित असताना महापोर्टलने उमेदवारांना उडवाउडवीची उत्तरे देण्याचे प्रकारही घडले. ती परीक्षा अद्यापही झाली नाही. त्यातच विशेष म्हणजे, एका पदासाठी एकाच दिवशी परीक्षा होणार असताना उमेदवारांना एकाच ठिकाणी परीक्षा देण्याची संधी आहे. त्यामुळे उमेदवारांकडून केवळ शुल्काची रक्कम वसूल करण्यासाठी पसंतीक्रमाचा पर्याय देण्याऐवजी स्वतंत्र अर्ज करण्याचा अट्टहास महापरीक्षा पोर्टलने केला. त्यामध्ये बेरोजगारांची आर्थिक पिळवणूकच झाली आहे.
परभणीतील दलालांकडून ‘सेटिंग’
महापरीक्षा पोर्टलमार्फत मेगा भरतीची प्रक्रिया राबविताना घोटाळा करण्याची संधी साधण्यात आली. त्यासाठी परभणी शहरातील काही दलालांनी उमेदवारांशी थेट संपर्क केल्याची माहिती आहे. दोन लाख रुपये टोकन घेऊन १८ ते २० लाख रुपयांत नोकरी देण्याचा सौदाही करण्यात आला.
चौकशीत पुढे येईल भरती घोटाळा
वनरक्षक पदाच्या भरतीमध्ये पुणे, जळगाव जिल्ह्यात गैरप्रकार झाला. त्यात दलालांनी केलेल्या प्रतापाच्या तक्रारी झाल्या. याच पदासाठी औरंगाबादमध्ये शारीरिक चाचणी परीक्षेत अनुपस्थित उमेदवारांना नियुक्तीची शिफारस देण्यात आली.
१८०० तलाठी पदांसाठी घेतलेल्या परीक्षेत उमेदवारांवर अन्याय झाल्याचे प्रकरण उघड झाले. महापरीक्षा पोर्टलची चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघड होईल, अशा तक्रारीही राज्यात सर्वत्र झालेल्या आहेत. आता जिल्हा परिषदेची पदभरतीही रखडली आहे. ती परीक्षा शासकीय यंत्रणेकडूनच घ्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.