‘हुक्का पार्लर’च्या शिक्षकांवर मेहेरनजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:51 AM2017-09-18T01:51:48+5:302017-09-18T01:52:01+5:30
पातूर रोडवरील अमनदीप ढाब्यावर विद्यार्थ्यांसोबतच ‘हुक्का पार्लर’ची नशा करणार्या ‘बेधुंद’ ११ शिक्षकांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, या घटनेला आठ दिवसांचा कालावधी उलटल्यावरही शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने या नशेबाज शिक्षकांवर शिक्षण विभागाचीच मेहेरनजर असल्याची चर्चा आहे. शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी जुने शहर पोलिसांना अद्याप कारवाईची विचारणा केली नसल्याने या शिक्षकांची पाठराखण केली जात असल्याचे वृत्त आहे.
सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पातूर रोडवरील अमनदीप ढाब्यावर विद्यार्थ्यांसोबतच ‘हुक्का पार्लर’ची नशा करणार्या ‘बेधुंद’ ११ शिक्षकांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, या घटनेला आठ दिवसांचा कालावधी उलटल्यावरही शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने या नशेबाज शिक्षकांवर शिक्षण विभागाचीच मेहेरनजर असल्याची चर्चा आहे. शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी जुने शहर पोलिसांना अद्याप कारवाईची विचारणा केली नसल्याने या शिक्षकांची पाठराखण केली जात असल्याचे वृत्त आहे.
पातूर रोडवरील नावाजलेल्या अमनदीप ढाब्यावर मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे चालत असून, बेकायदेशीररीत्या ‘हुक्का पार्लर’ चालविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह शनिवार ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री गंगानगर येथील रहिवासी मोहम्मद मुख्तबीर शेख बशीर याच्या मालकीच्या अमनदीप ढाब्यावर छापेमारी करून १0 शिक्षक, मुख्याध्यापकांना अटक केली होती. या छापेमारीत शिक्षक महेश सीताराम मानकरी (३९), दिनेश आत्माराम केकन (४0), संतोष तेजसिंह राठोड (४३), विजय पांडुरंग भुतकर (३८), सुनील ज्ञानदेव गवळी (३६), गोपीकृष्ण राजाराम येनकर (५१), सुखदेव रामजी शिंदे (४0), अनिल नामदेव दाते (४४), संजय देवराव इंगळे (४३), धीरज नंदू यादव (३२), या १0 मुख्याध्यापक शिक्षकांसह १0 विद्यार्थी व ढाबा मालकास अटक करण्यात आली होती.
त्यानंतर या प्रकरणाची चौकशी जुने शहर पोलिसांनी सुरू केली असून, शिक्षण विभागाकडून त्यांना पत्र देऊन शिक्षकांवर काय गुन्हे दाखल केले, त्यांच्यावर शिक्षण विभागाने काय कारवाई करायला हवी, याचा अहवाल मागणे अपेक्षित होते; मात्र शिक्षण विभागाने साधी चौकशीही न केल्याने या १0 शिक्षकांची पाठराखणच या विभागाने सुरू केल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षण विभागाला पत्र देण्याची प्रक्रिया केली आहे. यामध्ये त्यांनी दहाही शिक्षक नशेत असल्याचा वैद्यकीय अहवाल व अन्य माहिती शिक्षण विभागाला देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. हे पत्र सोमवारी शिक्षण विभागाला मिळणार आहे; मात्र यापूर्वीच शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसोबत हुक्का पार्लरमध्ये बसणार्या या शिक्षकांवर कारवाई न करण्यासाठी ‘अर्थ’पूर्ण डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. शिक्षकांची प्रतिमा मलीन करणार्या अशा शिक्षकांवर आतापर्यंत कारवाई न केल्याचे शिक्षण विभागाची कार्यपद्धती संशयाच्या फेर्यात सापडली आहे.
विधिज्ञानेच केली दुकानदारी
या प्रकरणात विद्यार्थी व शिक्षकांना पकडल्यानंतर शिक्षकांनी एक रुपयाही देण्यास नकार दिला, तर विद्यार्थ्यांकडून काही विधिज्ञांनी प्रत्येकी ५ ते १0 हजार रुपयांची रक्कम उकळल्याची चर्चा पोलीस दलात आहे. या विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली ही रक्कम विधिज्ञ व आणखी कुणामध्ये वाटण्यात आली, याची खमंग चर्चा सुरू आहे. सदर विधिज्ञांकडून पोलीस अधिकार्यांचेही नाव घेण्यात येत आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारीही याची माहिती घेत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शिक्षण विभागाकडून अद्याप पत्र प्राप्त झाले नाही. या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली असून, पुढील कारवाई शिक्षण विभाग करणार असल्याने त्यांना पोलीस कारवाईचा अहवाल देण्यात येणार आहे. सोमवारीच हे पत्र शिक्षण विभागाला देण्यात येणार आहे.
- विनोद ठाकरे, ठाणेदार, जुने शहर पोलीस स्टेशन
चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात चौकशी अहवाल प्राप्त होणार असून, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कारवाईचा प्रस्ताव सादर करणार आहे. पोलिसांनी काय कारवाई केली यासाठी सोमवारी पत्र देण्यात येणार आहे.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, अकोला