मेहकर रस्त्यावरून जाताय? सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:34+5:302021-07-21T04:14:34+5:30
खड्ड्यांमुळे वाढू शकते पाठदुखी! पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था : वाहन चालविताना कसरत संतोषकुमार गवई पातूर : तालुक्यातील ...
खड्ड्यांमुळे वाढू शकते पाठदुखी!
पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था : वाहन चालविताना कसरत
संतोषकुमार गवई
पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. तसेच सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तालुक्यातील मेहकरला जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनचालकांना पाठदुखीला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तालुक्यातील माझोड-बाभूळगाव व बाभूळगाव-आलेगाव या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा रस्ता पुढे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरला जोडतो. रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहने बिघडत असून, वाहनचालकांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे.
--------------------------------------
या रस्त्यावर गती कमी ठेवलेलीच बरी!
------
माझोड-बाभूळगाव रोड
माझोड-बाभूळगाव रस्ता महत्त्वाचा असून, या मार्गावरून अकोल्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या मार्गाने बाभूळगाव, तांदळी, दादुलगाव, माझोड आदी गावांतील ग्रामस्थांची वर्दळ सुरूच असते. रस्त्यावर खड्डे असल्याने या मार्गाने गती कमी ठेवणे वाहनचालकांसाठी फायेदशीर ठरत आहे. गती वाढविल्यास अपघाताची भीती आहे.
------------------------------
बाभूळगाव-आलेगाव रोड
तालुक्यातील बाभूळगाव-आलेगाव रस्ता हा पुढे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरशी जोडत असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. तालुक्यातील महत्त्वाचा रस्ता असूनही या मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गाने गती कमी ठेवल्यास अपघाताची भीती टाळता येणे शक्य आहे.
----------------------------------
वाहनाचा खर्च वाढला, पाठदुखीही वाढली!
खड्डेमय रस्त्यामुळे वाहनाची सर्व्हिसिंग लवकर करावी लागत आहे. नेहमी नेहमी सर्व्हिसिंग करीत असल्याने महागाईच्या काळात वाहनाचा खर्च वाढल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
-नीलेश पाकदुने, वाहनचालक, तांदळी
---------
आलेगाव-बाभूळगाव मार्गावर खड्डे वाढले असून, याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचालकास खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पाठदुखीचा त्रास वाढला आहे.
माणिकराव जाधव, वाहनचालक, बाभूळगाव.
-----------------
खड्ड्यांमुळे मणक्याचा त्रास
खड्डेमय रस्त्याने प्रवास सुरू असल्यामुळे वाहनचालकास मणक्याचा त्रास जाणवत आहे. सद्यस्थितीत रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे वाहनचालकांनी वाहनाची गती कमी करून वाहन चालवावे, अशी प्रतिक्रिया डॉ. उल्हास घुगे यांनी दिली.
----------
अधिकारी प्रतिक्रिया
माझोड- बाभूळगाव व बाभूळगाव-आलेगाव रस्त्याचे त्वरितच डांबरिकरण करण्यात येणार असून, वाहनचालकांच्या समस्या दूर होणार आहेत.
हेमंत राठोड, शाखा अभियंता, सार्वजिक बांधकाम उपविभाग क्र २, अकोला.