जिल्हयातील पाणीटंचाइच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्य आक्रमक; सदस्यांनी सभेत झळकविला ‘लोकमत’
By संतोष येलकर | Published: June 24, 2023 05:02 PM2023-06-24T17:02:49+5:302023-06-24T17:03:15+5:30
आभारही मानले; तातडीने उपाययोजनांची रेटली मागणी
अकोला : तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागांत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह वेगवेगळ्या भागांतील पाणीटंचाईचा प्रश्न लावून धरत, शुक्रवार २३ जून रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत, संताप व्यक्त केला. गेल्या दहा दिवसांपासून ‘झळा पाणीटंचाईच्या’ या वृत्तमालिकेव्दारे पाणीटंचाइची तीव्रता ‘लोकमत’मध्ये मांडण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सभेत ‘लोकमत’ झळकवित पाणीटंचाइ प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी रेटून धरली.
यंदाचा पावसाळा सुरू होऊन २३ दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र, अद्यापही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसतानाच तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. त्यामध्ये गोड्या पाण्याचे स्रोत नसलेल्या जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह अनेक गावांत पंधरा ते वीस दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पंधरा ते वीस दिवस पुरेल एवढे पाणी साठवून ठेवणे शक्य होत नसल्याने, तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याकरिता तापत्या उन्हात ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या १३ जूनपासून ‘लोकमत’मध्ये ‘झळा पाणीटंचाई’च्या ही वृत्तमालिका प्रकाशित करण्यात येत असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. २३ जून रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या वृत्तमालिकेची दखल घेण्यात आली.
जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, सदस्य राम गव्हणकर, प्रमोदिनी कोल्हे, गजानन पुंडकर आदी सदस्यांनी सभेत ‘लोकमत’मध्ये प्रकाशित ‘पाणीटंचाईच्या झळा’ या वृत्तमालिकेचे अंक झळकवले. वृत्तमालिकेच्या माध्यमातून ‘लोकमत’ जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेत असल्याने संबंधित सदस्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले आणि जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही सदस्यांनी सभेत रेटून धरली. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष सुनील फाटकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, शिक्षण सभापती माया नाइक, महिला बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.