शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक - डॉ. अविनाश सावजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:39 AM2019-02-09T10:39:05+5:302019-02-09T10:39:28+5:30
शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध समाजसेवक प्रयास सेवांकुर अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांनी व्यक्त केले.
अकोला: गत काही वर्षांपासून कॅन्सरचा आजार सातत्याने वाढत आहे. त्यासाठी समाजामध्ये जनजागृती आवश्यक आहे. कॅन्सरच्या आजाराशी लढा देण्यात यशस्वी झालेल्या योद्ध्यांच्या अनुभवाद्वारे समाजामध्ये जनजागृतीचा प्रयत्न सुरू आहे. शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध समाजसेवक प्रयास सेवांकुर अमरावतीचे डॉ. अविनाश सावजी यांनी व्यक्त केले.
प्रयास सेवांकुर अमरावती व आरंभ संस्था अहमदनगरच्यावतीने अहमदनगर ते अमरावतीदरम्यान कॅन्सर प्रबोधन यात्रेला ४ फेब्रुवारी नगर येथून सुरुवात झाली. ही यात्रा शुक्रवारी अकोल्यात आली होती. त्यावेळी पत्रपरिषदेत ते बोलत होते.
समाजामध्ये कॅन्सरच्या आजाराविषयी जनजागृती व्हावी, यासाठी आरंभचे प्रदीप काकडे यांनी कॅन्सरशी यशस्वी लढा देणारे गीता पोळ (औरंगाबाद), शरीफ शेख, वैशाली वैराडकर (बुलडाणा) यांना घेऊन ही कॅन्सर प्रबोधन यात्रा काढली आहे. असे सांगत, डॉ. अविनाश सावजी यांनी, कॅन्सरच्या आजारासाठी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे, यासाठी यात्रेच्या माध्यमातून आम्ही औरंगाबाद, जालना, अकोल्यातील संत तुकाराम हॉस्पिटलला भेटी दिल्या. पाच वैद्यकीय महाविद्यालयांनासुद्धा भेट दिली. यासोबतच शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. स्तन, मुख आणि शरीराचा कॅन्सर गंभीर विषय आहे. असे त्यांनी सांगितले कॅन्सर योद्धा गीता पोळ यांनी स्तनाचा कॅन्सर झाल्यानंतरही त्यातून सकारात्मक विचारातून बाहेर पडले. आता कॅन्सर झालेल्या महिलांना एकत्र करून त्यांना कॅन्सरवर मात करण्यासाठी प्रेरित करीत असल्याचे सांगितले. डॉ. सावजी यांनी, कॅन्सरवर मात करण्यासाठी शासनाने कॅन्सर आजारातून बरे झालेल्यांना रुग्ण समुपदेशनाचे काम दिले तर त्याचा फायदा होईल, असे सांगितले. पत्रपरिषदेला रा.तो. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशुतोष कुळकर्णी, डॉ. सुनील बिहाडे, डॉ. राजेंद्र मेंडकी, डॉ. दिलीप मानकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)