मनपा कॉन्व्हेंट; महिला शिक्षकांसाठी पदभरती
By admin | Published: July 6, 2017 12:53 AM2017-07-06T00:53:45+5:302017-07-06T00:53:45+5:30
अकोला : सर्वसामान्य कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी महापालिका प्रशासनाने यंदापासून मनपा शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सर्वसामान्य कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी महापालिका प्रशासनाने यंदापासून मनपा शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नर्सरी, केजी-१, केजी-२ यानुसार मनपाच्या ३४ शाळांमध्ये इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमाला सुरुवात केली जाणार असून, शिक्षक पदासाठी ३४ महिलांची पदभरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होताच मनपाच्या शिक्षण विभागात इच्छुक महिलांची गर्दी झाल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले.
महापालिकेच्या मराठी आणि हिंदी माध्यमाच्या ३४ शाळा असून, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत दिवसेंदिवस घसरण झाल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाच्या भ्रष्ट आणि कुचकामी धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची ऐशीतैशी झाली आहे. शिक्षक संघटनांच्या मनमानीसमोर हतबल ठरलेल्या शिक्षण विभागावर शाळा बंद करण्याची नामुष्की ओढवल्याची परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम ठेवण्यासाठी तसेच गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशातून महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मनपाच्या शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या शालेय सत्रापासून ३४ शाळांमध्ये नर्सरी, केजी-१, केजी-२ चे वर्ग सुरू केल्या जातील. निकषानुसार पात्र ३४ महिला शिक्षक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी ३४ महिला मदतनीस यांची निवड केली जाणार आहे.
त्यासाठी मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने पात्र उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली असून, ७ जुलै अंतिम मुदत देण्यात आली आहे. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर १० जुलै रोजी इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पार पडेल. अर्ज दाखल करण्याची मुदत लक्षात घेता इच्छुक महिला उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी शिक्षण विभागात गर्दी केल्याचे चित्र होते.
निवड प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
चिमुकल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी पात्र महिला उमेदवारांची शिक्षक पदासाठी निवड केली जाईल. शैक्षणिक अर्हतेमध्ये कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. निवड प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती आहे.