पारा ४४.३ अंशांवर, सकाळपासूनच उन्हाच्या झळा; अकोलेकर त्रस्त, शहरातील मुख्य रस्ते पडले ओस
By रवी दामोदर | Published: May 4, 2024 07:00 PM2024-05-04T19:00:38+5:302024-05-04T19:00:47+5:30
यंदाच्या उन्हाळ्यात उष्म्याने कहर केला असून,सकाळपासूनच उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
अकोला : यंदाच्या उन्हाळ्यात उष्म्याने कहर केला असून,सकाळपासूनच उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारी उन्हाचा पारा उच्चांकावर पोहोचला असून, तापमान ४४.३ अंश होते. वाढलेल्या उन्हामुळे भर दुपारी शहरातील मुख्य रस्ते ओस पडल्याचे दिसून आले. गत काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. पारा चाळीशीकडे गेला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची दाहकता वाढल्याचे जाणवत आहे. गत पंधरा दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता.
दरम्यान, आता पुन्हा उन्हाच्या प्रचंड झळा जाणवू लागल्या आहेत. शनिवारी उन्हाने उच्चांक गाठला असून, तापमान तब्बल ४४.३ अंश होते. डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंटचा रस्ता उष्णता साठवून ठेवत असल्याने या रस्त्यावरून जाताना झळा अधिक जाणवून येत आहेत. परिणामी उन्हाच्या चटक्यांमुळे प्रवास नकोसा झाला आहे.त्यामुळे भर दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. उन्हापासून बचावासाठी दुचाकीस्वार हेल्मेट, स्कार्प, रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत. यातूनही घामाघूम होऊन रसवंतीगृह, शीतपेयांची ठिकाणे शोधत आहेत.
मागील पाच दिवसांचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
वार - किमान तापमान - कमाल तापमान
सोमवार, दि.२९ एप्रिल - २८.२ - ४२.३
मंगळवार, दि.३० एप्रिल - २७.५ - ४३.९
बुधवार, दि.१ मे - २६.२ - ४३.१
गुरुवार, दि.२ मे - २४.२ - ४२.३
शुक्रवार, दि.३ मे - २२.५ - ४३.४
शनिवार, दि.४ मे - २३.२ - ४४.३