मेरे राखी का मतलब है प्यार भैया… - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:15+5:302021-08-22T04:22:15+5:30
बहीण-भावाच्या अतूट नात्याचे बंधन रक्षाबंधन सण साजरा करून दरवर्षी नव्याने अधिक घट्ट केले जाते. अगदी लहानपणापासून बहीण-भावामध्ये सुख-दुःखाचे उभे-आडवे ...
बहीण-भावाच्या अतूट नात्याचे बंधन रक्षाबंधन सण साजरा करून दरवर्षी नव्याने अधिक घट्ट केले जाते. अगदी लहानपणापासून बहीण-भावामध्ये सुख-दुःखाचे उभे-आडवे धागे एकत्रित विणून वर्षानुवर्ष हे रक्षाबंधन अतूट होत असते. राखी म्हणून जो धागा भावाच्या हातात बांधला जातो ही केवळ नावापुरती परंपरा नाही त्यातील भावना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जन्माला आल्यापासून एकत्रित राहिलेले बहीण-भाऊ विवाहानंतर वेगवेगळ्या मार्गाने जातात त्यावेळी त्यांना एकत्रित आणण्याचे एक माध्यम म्हणजे रक्षाबंधन. कारण तो स्नेह हा दिवस जपून ठेवतो. फक्त हे बंधन बहीण आणि भावांनी समजून घ्यावे!
हल्ली या पवित्र नात्यातही स्वार्थ भरलेला दिसतो. कुठे कुठे हा सण देण्या- घेण्यापुरता राहिला आहे. बहीण भावाच्या या नात्यात व्यवहार, व्यापार डोकावताना दिसतो. पैशाने सर्व काही तोलणाऱ्या या जगात निरर्थक गोष्टीलाही महत्त्व दिले जाते. बहिणीने राखी बांधली की गलेलठ्ठ मागणी असते किंवा बहीण मोठी मागणी करेल, अशी भावाला भीती असते. अशा वेळी पवित्र नात्यात प्रेम लोपल्यासारखे वाटते. खरेतर हा पवित्र धागा म्हणजे केवळ साधा धागा नसून तो बांधण्यामागची भावना तेवढीच पवित्र असली, तर तो अनमोल असतो. या धाग्यात प्रेम, स्नेह, ममता बांधली गेली पाहिजे. हे एक पवित्र बंधन आहे. मुळात नि:स्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचे नाते म्हटले जाते.
तसेच या सणामागची दुसरी भूमिका म्हणजे, महिलाप्रती असलेल्या संरक्षणाची भावना वाढीस लागावी. आपल्या संस्कृतीमध्ये अशा सणांना बांधून समाजाला योग्य दिशा दिली जाते. राखी या शब्दात ‘रक्षण कर’ किंवा ‘राख म्हणजे सांभाळा’ हा संकेत आहे. कोणत्याही कर्तबगार करारी पुरुषाच्या हाती राखी बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हा त्याचा गर्भित अर्थ असल्यामुळे आज जागोजागी स्त्रियांवर अत्याचार होताना दिसतात. अशा वेळी पुरुषाने प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा तिच्यावर अत्याचार नाही, तर तिचे रक्षण करावे. हा रक्षणामागचा उद्देश खूप मोठा आहे. रक्षाबंधन हे देशात समाजात परिवारात एकसूत्रता, एक बद्धता राहावी, प्रेम, सलोख्याचे भाव निर्माण व्हावे या हेतूने सणाच्या माध्यमातून संस्कृतीने सांगितलेला हा एक सुंदर उपाय आहे. राखी म्हणजे एक अनमोल धागा जो कोणत्याही संपत्ती सोबत तोलला जाऊ शकत नाही. बहीण-भावाच्या नात्याला दरवर्षी एक घट्ट प्रेमाची लपेट यामुळे बसते, म्हणून राखीचा अर्थ केवळ प्रेम आणि प्रेम आहे...
-प्रा. संगीता के. पवार (काळणे),
विदर्भ महाविद्यालय, बुलडाणा