‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान! शिलाफलक उभारून जिल्ह्यातील २४ हुतात्म्यांना केले जाणार नमन
By संतोष येलकर | Published: August 5, 2023 08:00 PM2023-08-05T20:00:23+5:302023-08-05T20:00:33+5:30
५१५ ग्रामपंचायतींच्या ठिकाणीदेखील शिलाफलक लावून देशाच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करलेल्या वीरांना नमन करण्यात येणार आहे.
अकोला: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत येत्या ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या जिल्ह्यातील २४ हुतात्म्यांच्या नावाचे त्यांच्या गावात शिलाफलक (स्मारक फलक) उभारून वीर जवानांना नमन करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील ५१५ ग्रामपंचायतींच्या ठिकाणीदेखील शिलाफलक लावून देशाच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करलेल्या वीरांना नमन करण्यात येणार आहे.
सैन्यदलात कार्यरत असताना देश रक्षणाची कामगिरी बजावताना वीरमरण पत्करलेल्या जिल्ह्यातील २४ हुतात्म्यांच्या नावाचे त्यांच्या गावात शिलाफलक उभारून शहिद जवानांना नमन करण्यात येणार आहे. त्यामध्ये अकोला शहरातील चार शहीद जवानांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २० शहीद जवानांचे त्यांच्या गावात शिलाफलक उभारण्यात येणार असून, हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील ५१५ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडीच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी देशाचे स्वातंत्र्य आणि गौरवाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांना नमन, असे वाक्य नमूद केलेले शिलाफलक उभारून देश रक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीरांना नमन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील संबंधित ठिकाणी शिलाफलक उभारणीच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत.