महेंद्र कल्याणकर यांना निरोप
By admin | Published: January 22, 2015 02:00 AM2015-01-22T02:00:36+5:302015-01-22T02:15:06+5:30
कार्यक्रमावर अकोला मनपा कर्मचा-यांचा बहिष्कार
अकोला: महापालिका आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांची नागपूर येथे बदली झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी खुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला; परंतु थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्यात आयुक्तांना अपयश आल्याचा आरोप करीत मनपा कर्मचार्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला. मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर ऑक्टोबर महिन्यात प्रशिक्षणासाठी बाहेरगावी होते. डिसेंबर महिन्यात प्रशिक्षण आटोपल्यानंतर ते मनपात पुन्हा कार्यरत होतील, अशी अपेक्षा होती. २0 जानेवारी रोजी अचानक त्यांची नागपूर येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नती झाली. त्यानुषंगाने वरिष्ठ अधिकार्यांनी डॉ.कल्याणकर यांना निरोप देण्यासाठी खुले नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, विजय देशमुख, साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे, मुख्य लेखा परीक्षक सुरेश सोळसे, विरोधी पक्षनेता साजीद खान, काँग्रेस गटनेता दिलीप देशमुख, माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी, वैद्यकीय अधिकारी डॉ.फारूख शेख, गौतम गवई, भारिप गटनेता गजानन गवई यांची उपस्थिती होती.
*कर्मचार्यांचा बहिष्कार
थकीत वेतनाच्या मुद्यावर प्रशासन चर्चा करण्यास तयार नसताना निरोप समारंभाला मात्र उपस्थित राहण्याचे फर्मान वरिष्ठ अधिकार्यांनी सोडले; परंतु थकीत वेतनामुळे कर्मचार्यांसह शिक्षकांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचे समोर आले. मनपाचे विरोधी पक्षनेता वगळता पदाधिकारी व नगरसेवकांनीदेखील कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.