महारॅलीने दिला अवयवदानाचा संदेश!
By admin | Published: August 31, 2016 02:46 AM2016-08-31T02:46:16+5:302016-08-31T02:46:16+5:30
अकोला येथे अनेकांनी केला अवयवदानाचा संकल्प.
अकोला, दि. ३0: वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अवयवदान जागृती महारॅली काढण्यात आली. महारॅलीच्या माध्यमातून नागरिकांना अवयवदान करण्याचा संदेश देण्यात आला. जिते जिते रक्तदान..जाते जाते अवयवदान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. यादरम्यान अकोलेकर नागरिकांनी अवयदान करण्याचा संकल्प करीत, संकल्पपत्र भरून दिले. महारॅलीची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सकाळी ७.३0 वाजता झाली. महारॅलीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी आमदार गोपीकिसन बाजोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, आयएमएचे अध्यक्ष डॉ. कैलास मुरारका, सचिव डॉ. जुगल चिराणिया, अभ्यागत मंडळाचे सदस्य वर्षा धनोकार, दीपक मायी, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत डवंगे, डॉ. दिनेश नेताम, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, महेश महाकालीवार, डॉ. राजेश कांबे प्रामुख्याने उपस्थित होते. अवयवदान महारॅली अशोक वाटिका, मुख्य डाकघर कार्यालयासमोरून मार्गक्रमण करीत हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौक, गांधी रोड, पंचायत समिती कार्यालयासमोरून जिल्हाधिकारी कार्यालय चौकातून होत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचली. महारॅलीमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी, परिचारिका, अधिपरिचारीकेसह आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. महारॅलीचा वैद्यकीय महाविद्यालयात समारोप करण्यात आला. यावेळी डॉ. कार्यकर्ते यांनी नागरिकांनी अवयव दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.