अकोला जिल्ह्यात मीटर रिडिंगची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 05:44 PM2020-06-19T17:44:54+5:302020-06-19T17:45:16+5:30
वीज मीटरचे रिडिंग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
अकोला : महावितरणच्या ग्राहकांना योग्य वीज वापराचे अचूक वीज बिल देण्यासाठी मीटरचे रिडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणाच्याही संपर्कात न येता घराबाहेर असलेल्या वीज मीटरचे रिडिंग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
रिडिंग घेणाºया कर्मचाऱ्यांचा रिडिंग घेताना कोणाशीही संपर्क येत नाही. सर्व मीटर ग्राहकांच्या घराबाहेर असल्याने तसेच अपार्टमेंटमध्ये वीज मीटरची तळमजल्यावर स्वतंत्र खोली असल्याने रिडिंगसाठी घरात किंवा इमारतीमध्ये जाण्याची गरज नाही. मीटर रिडिंगची प्रक्रिया महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे होत आहे. मोबाइलद्वारे एका मीटर रिडिंगचा फोटो काढणे व रिडिंग घेणे यासाठी केवळ ८ ते १० सेकंदांचा कालावधी लागतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडिंग घेण्याचे काम तात्पुरते थांबविण्यात आले होते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आता जूनमध्ये स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळालेल्या भागात आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून मीटर रिडिंग घेण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडिंग उपलब्ध होऊ न शकल्याने वीज ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार सरासरी वीज बिल देण्यात आले. आता जूनमध्ये घेतलेल्या प्रत्यक्ष रिडिंगद्वारे गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमधील अचूक वीज वापरानुसार वीज बिल दुरुस्त करण्यात येत आहे. तसेच बिलांची रक्कम भरल्यास त्याचे योग्य समायोजन करण्यात येत आहे.
ज्या भागातील ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडिंग घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळाली आहे; मात्र कर्मचाºयांना रिडिंग घेण्यासाठी सोसायटीत प्रवेश नाकारला जात असेल तर तेथील वीज ग्राहकांना पुन्हा सरासरी वीज बिले जाण्याची शक्यता आहे. तसेच अचूक बिलासाठी पुन्हा पुढील महिन्यातील मीटर रिडिंगसाठी प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे मीटर रिडिंग घेणाºया कर्मचाºयांना सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
नियमांचे पालन करण्याच्या सूचना
स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागामध्ये आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेन्ट एरिया) वगळून वीज ग्राहकांकडील मीटरचे रिडिंग घेण्यात येत आहे. संबंधित एजन्सीजच्या कर्मचाºयांनी मीटर रिडिंग घेताना हॅण्डग्लोव्हज, मास्क, सॅनिटाझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.