मोबाइल ‘एसएमएस’द्वारेही पाठविता येणार मीटर रीडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 10:29 AM2021-05-03T10:29:30+5:302021-05-03T10:29:38+5:30
Meter readings can also be sent via mobile SMS : मोबाइल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रीडिंग पाठविण्याची खास सोय उपलब्ध करून दिली आहे.
अकोला : महावितरणने मोबाइल ॲप व वेबसाइटद्वारे वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता मोबाइल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रीडिंग पाठविण्याची खास सोय उपलब्ध करून दिली आहे.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात सध्या संचारबंदी सुरू आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतरही वीजग्राहकांना महावितरण मोबाइल ॲप किंवा वेबसाइटद्वारे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सोय कायम ठेवून महावितरणने आता मोबाइल ‘एसएमएस’द्वारे देखील ग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
ज्या ग्राहकांकडे स्मार्ट फोन नाही अशा ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीज बिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकदेखील नमूद आहे. रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल ॲप किंवा वेबसाइटद्वारे रीडिंग पाठविता येईल. सोबतच या चार दिवसांमध्ये आता मोबाइल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रीडिंग पाठविता येणार आहे.
‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविण्यासाठी ग्राहकांनी स्वतःचा मोबाइल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे. या नोंदणीकृत मोबाइलवर मीटर रीडिंग पाठविण्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविणे आवश्यक आहे.
असे पाठवा रीडिंग
एसएमएसद्वारे रीडिंग पाठविण्यासाठी वीजग्राहकांनी MREADस्पेस१२ अंकी ग्राहक क्रमांक स्पेस KWH रीडिंग ८ अंकापर्यंत असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाइल क्रमांकावर पाठवायचा आहे.