११ हजार वीज ग्राहकांनी स्वत: पाठविले मीटर रिडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 07:55 PM2020-08-17T19:55:28+5:302020-08-17T19:55:41+5:30
या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार महावितरणकडून वीज बिल मिळाले आहे.
अकोला : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत अकोला परिमंडलातील ११ हजार ७८१ वीज ग्राहकांनी मोबाइल अॅपद्वारे जुलै महिन्याचे स्वत:हून मीटर रिडिंग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार महावितरणकडून वीज बिल मिळाले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाकडून सुरुवातीला लॉकडाऊन आणि आता अनलॉकसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या २३ मार्चपासून तात्पुरती बंद केलेली मीटर रिडिंग, वीज बिलांची छपाई व त्याचे वितरण करणे प्रतिबंधित क्षेत्र वगळता जूनपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील किंवा ज्या ग्राहकांचे मीटर रिडिंग उपलब्ध होणे शक्य होत नाही, अशा वीज ग्राहकांना सरासरीनुसार वीज बिल पाठविण्यात येतात.
मात्र महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे वीज ग्राहकांना मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठवून स्वत: रिडिंग घेण्याची सोय उपलब्ध आहे. या रिडिंगप्रमाणे वीज वापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी मीटरच्या रिडिंगचे फोटो पाठविण्याचे आवाहन या अगोदरच करण्यात आले होते. त्यासाठी वीज ग्राहकांच्या मोबाइलमध्ये महावितरण अॅप डाउनलोड केलेले असणे गरजेचे आहे. ज्या ग्राहकांचे मीटर रिडिंग मीटर वाचकाकडून झाले नाही अशा ग्राहकांना मोबाइल अॅपवर महावितरणकडून एसएमएस पाठविला जातो. त्यामध्ये मीटर रिडिंग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येते. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्यापासून १३ आॅगस्टपर्यंत परिमंडळातील एकूण ५५ हजार ११६ वीज ग्राहकांनी,तर केवळ जुलै महिन्यात यापैकी ११ हजार ७८१ वीज ग्राहकांनी मोबाइल अॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये स्वत:च मीटर रिडिंग पाठविले आहे.
अकोला जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद
जुलै महिन्यात महावितरणकडे स्वत:हून मीटर रिडिंग पाठविलेल्या वीज ग्राहकांमध्ये अकोला परिमंडलामधील - एकूण ११,७८१ ग्राहकांपैकी अकोला जिल्ह्यातील ५५२२, बुलडाणा जिल्ह्यातील ४,७१९ व वाशिम जिल्ह्यातील १,५४० वीज ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणने वीज ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. कोरोनाच्या सावटामुळे महावितरणकडून प्रत्यक्ष रिडिंग घेण्याची प्रक्रिया झाली नसल्यास वीज ग्राहकांनी मोबाइल अॅपद्वारे दिलेल्या मुदतीत मीटर रिडिंगचा फोटो अपलोड करून मीटर रिडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाकडून करण्यात येत आहे.