राज्यात दोन लाखांवर वीजग्राहकांनी स्वत:हून पाठविले मीटर रीडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:50 PM2021-05-06T17:50:33+5:302021-05-06T17:52:53+5:30
MSEDCL News : वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.
अकोला : स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठविण्यास वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी मोबाइल ॲप, वेबसाइट व ‘एसएमएस’द्वारे मीटरचे रीडिंग महावितरणकडे पाठविले आहे. यामध्ये पुणे परिमंडळातील सर्वाधिक ४९,९५० तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडळातील २८,९१६ वीजग्राहकांचा समावेश आहे.
वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय कायम ठेवण्यासोबतच मीटर रीडिंग पाठविण्याची मुदत देखील चार दिवस करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत आता मोबाइल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रीडिंग पाठविण्याची खास सोय उपलब्ध आहे. याआधी मागील मार्च महिन्यात १ लाख ३५ हजार २६१ ग्राहकांनी मीटर रीडिंग पाठविले होते. या ग्राहकांमध्ये एप्रिल महिन्यात ६७ हजार ४८१ संख्येने वाढ झाली आहे.
प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रीडिंगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल ॲप किंवा ‘एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्लूएच रीडिंग पाठविता येते. गेल्या एप्रिल महिन्यात राज्यातील २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठविलेले आहे. यात पुणे परिमंडळमधील ४९,९५०, कल्याण- २८,९१६, नाशिक- २२,३३०, भांडूप- १८,०९३, बारामती- १३,७३३, जळगाव- १०,८७७, औरंगाबाद- १०,१००, कोल्हापूर- ८,४७०, नागपूर- ७,२६९, अकोला- ७,१८०, लातूर- ६,०८५, अमरावती- ५,६६२, कोकण- ४,२२३, गोंदिया- ३,४६४, नांदेड- ३,२६२ व चंद्रपूर परिमंडळातील ३,१३८ वीजग्राहकांचा समावेश आहे.