कोरोनाबाधितांचे मीटर झाले 'डाऊन' अन् मात करणाऱ्यांचे 'अप' !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:21+5:302021-05-01T04:17:21+5:30
संतोष कुमार गवई पातूर : तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र ...
संतोष कुमार गवई
पातूर : तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे, तर कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने खालावत असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. एकंदरीत तालुक्यात बाधितांचे मीटर डाऊन आणि मात करणाऱ्यांचे अप असेच दिलासादायक चित्र आहे.
तालुक्यात आतापर्यंत १४१८ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यापैकी जवळपास ११५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थितीत केवळ २४४ रुग्ण सक्रिय आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन आणि ब्रेक द चेनच्या कडक निर्बंधामुळे रुग्णवाढीला तालुक्यात बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी तालुक्यात बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १२,९१६ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११,७३२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
-------------------------------------------------------
रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढले !
कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने कमी होत असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, बुधवारी सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
----------------------------------------------
तालुक्यात लसीकरणाला प्रतिसाद
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यात लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात आतापर्यंत ७,३१६ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी ८२४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान, तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.