दुप्पट उत्पादनासाठी सूक्ष्म सिंचनाचे नियोजन करावे लागणार!- डॉ. सी.डी. मायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 06:28 PM2018-12-15T18:28:42+5:302018-12-15T18:29:37+5:30
अकोला : शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करायची असेल, तर सूक्ष्म सिंचनासह, गट, सामूहिक शेतीचे नियोजन करावे लागणार असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी यांनी शनिवारी केले.
अकोला : शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करायची असेल, तर सूक्ष्म सिंचनासह, गट, सामूहिक शेतीचे नियोजन करावे लागणार असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी यांनी शनिवारी केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्मृतिदिनानिमित्त वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुसद, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (पोटेन्शियल, प्रोस्पेक्टस अॅण्ड स्टॅटेजीस फॉर डबलिंग फार्मर्स इन्कम)‘शेतकºयांच्या उत्पादनात दुप्पट वाढ’ या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील स्व. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित १७ व्या राष्टÑीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मायी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्टÑ राज्य पशुविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एम. पातूरकर, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवन, राष्टÑीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. एन. पी. सिंग बारामती, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर, डॉ. विलास खर्चे, डॉ. दिलीप मानकर, डॉ. महेंद्र नागदेवे, डॉ. प्रकाश कडू यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. मायी यांनी दुप्पट उत्पादनावर विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले, देशात अल्पभूधारकतेचे प्रमाण ६० टक्के असल्याने उत्पादनाची मर्यादा फारच कमी आहे. म्हणूनच प्रथम शेतकरी गट, कंत्राटी शेतीचे जाळे विणावे लागणार आहे. पाण्याचे सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक व तुषार सिंचनाचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे, तसेच शेतकºयांना बियाण्यांपासून ते कीटकनाशके, विमा योजना, शेतीसाठी लगाणाºया इत्थंभूत गोष्टींसाठी देशात दोन हजार माहिती केंद्र उघडावे लागणार आहेत. निर्यातक्षम उत्पादन, बाजाराची व्यवस्था, प्रक्रिया उद्योगावर तेवढाच भर देणे गरजेचे आहे, तसेच विद्यापीठ ही नोकरी देणारी संस्था किंवा रोजगार हमी योजना नाही. येथे संशोधन चालते, संशोधनासाठी विद्यापीठांना स्वातंत्र्य देताना संशोधनासाठी निधीची पूर्तताही करावी लागणार आहे. डॉ. पातूरकर यांनी हवामानाला अनुकूल तंत्रज्ञानाची गरज आहे. गुरांना वैरणाची गरज असल्याचे अधोरेखित केले. डॉ. धवन यांनी प्रक्रिया उद्योग, शेती उत्पादनाचे मूल्यवर्धन आवश्यक असल्याचे सांगताना, दुप्पट उत्पादनासाठी शेतीशी निगडित सर्वच क्षेत्राचा समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. भाले यांनी या विद्यापीठात ८० टक्के विद्यार्थी शेतकºयांची असून, अन्नधान्य दुप्पट करण्यासंबंधी विस्तृत माहिती दिली. पुसदकर यांनीही यावेळी विचार मांडले. संचालन डॉ. प्रदीप बोरकर यांनी केले. आभार डॉ. टेकाडे यांनी मानले.