मध्यान्ह भोजन : विद्यार्थ्यांना उपाशी ठेवल्यानंतरही देयकाची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 02:01 PM2018-12-02T14:01:55+5:302018-12-02T14:02:41+5:30
केवळ कागदोपत्री पुरवठा झालेल्या आहाराचे देयक अदा करताना आता संबंधित कंत्राटदारांवर कोट्यवधींची उधळण करण्याचा प्रकार घडत आहे.
- सदानंद सिरसाट
अकोला : दुष्काळी परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन द्या, असा आदेश असताना राज्यातील १४६७९ गावांत आहार देण्यातच आला नाही. आता केवळ कागदोपत्री पुरवठा झालेल्या त्या आहाराचे देयक अदा करताना आता संबंधित कंत्राटदारांवर कोट्यवधींची उधळण करण्याचा प्रकार घडत आहे. त्यासाठी कंत्राटदारांनी देयकेही सादर केली असून, ती अदा केली जात आहेत.
गेल्यावर्षीच्या हंगामात २०१७-१८ मध्ये पिकांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असलेल्या राज्यातील हजारो गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला. त्या गावांमध्ये करावयाच्या उपाययोजनांसाठी शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी आदेश दिला. ठरल्याप्रमाणे असलेल्या उपाययोजना त्या-त्या विभागाने राबविण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एप्रिल ते जून २०१८ या काळात (६७ दिवस) आहार देण्याची तयारी शिक्षण विभागाने केली. प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी सर्व जिल्हा परिषदांना आहार देण्यासाठी तांदूळ आणि निधीची मागणी करण्याचे पत्र १४ मार्च रोजी दिले. त्यातच मागणीअभावी तांदूळ किंवा निधी न मिळाल्यास विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहतील. त्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचेही बजावले. राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी मागणी केलेल्या हजारो टन तांदळाचा दाणाही आॅगस्ट २०१८ पर्यंत कोणत्याच जिल्ह्यात पोहोचलेला नव्हता, हे विशेष. १४६७९ गावांतील लाखो विद्यार्थ्यांसाठी आहारच शिजला नाही. ही परिस्थिती असताना त्या सुटीच्या काळात आहार वाटप केल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाचा कोट्यवधींचा निधी लाटण्याचा प्रकार घडत आहे.
केंद्र शासनाने तांदूळच दिला नव्हता...
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी तांदळाचा पुरवठा केंद्र शासनाकडून भारतीय खाद्य निगममार्फत केला जातो; मात्र तांदूळच मिळाला नव्हता. त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी ११२.१६ क्विंटल तांदूळ देण्यात आला. त्यातून शिजविण्यात आलेल्या आहार पुरवठ्यापोटी कोट्यवधींची देयकेही अदा केली जात आहेत. विशेष म्हणजे, ज्या गावांमध्ये आहार वाटप झाला नाही, तेथीलही देयक अदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उन्हाळी सुट्यांत ८३ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती
इयत्ता विद्यार्थी
पहिली ते पाचवी ६४७०७
सहावी ते आठवी १९१९८
विभागनिहाय दुष्काळी गावे
विभाग गावांची संख्या
अमरावती ६५२४
नागपूर ३२७५
औरंगाबाद ३५७७
कोल्हापूर ३०१
नाशिक १००२