जुलै अर्ध्यावर; तरी पाऊस कमीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 10:26 AM2021-07-17T10:26:47+5:302021-07-17T10:27:01+5:30
Rain News : सरासरीपेक्षा गतवर्षी १०० तर यंदा ८४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
अकोला : मागील ९-१० दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्या आटोपल्या असून पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे; मात्र जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. सरासरीपेक्षा गतवर्षी १०० तर यंदा ८४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या; परंतु त्यानंतर पावसाने पाठ फिरविली. जुलै उजाडला तरी पावसाचे चिन्ह दिसून येत नव्हते; मात्र ७ जुलैपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. जिल्ह्यात जवळपास पेरणी आटोपल्या आहेत. मागील ७ दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे कोमेजलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर दुबार पेरणीचे संकट टळले आहे. या पावसामुळे पिके तरली असली तरी सरासरी गाठली नाही. जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याचवेळी १०० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
सरासरी होणारा पाऊस
२५२.१
आतापर्यंत झालेला पाऊस
२१३.२
झालेला पाऊस (टक्के)
८४.६
दीड महिन्यात ३० टक्के पाऊस
रुसलेला वरुणराजा पुन्हा जिल्ह्यावर प्रसन्न झाला आहे. गत ९ दिवसांमध्ये जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. तर दीड महिन्यात वार्षिक सरासरीच्या ३० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पिके चांगली तरारली आहेत.
दोन दिवस कोरडेच!
जिल्ह्यात ७ जुलैपासून पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे कुठे तुरळक तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे; मात्र गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांमध्ये कुठेच पाऊस झाला नाही. केवळ पातूर तालुक्यात तुरळक पाऊस झाला.
फवारणीला वेग!
जून महिन्यात सुरुवातीला सिंचन उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. या शेतकऱ्यांचे पीक जोमात आहे. यंदा सोयाबीनही डौलाने उभे आहे. त्यामुळे पुढील काळात पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव पाहता फवारणीला वेग आला आहे.