अखेर एमआयडीसी पोलीस ठाणे कार्यान्वित!
By Admin | Published: January 15, 2016 01:55 AM2016-01-15T01:55:04+5:302016-01-15T01:55:04+5:30
गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन.
अकोला: जिल्हय़ात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ठाणे असलेल्या सिव्हिल लाइनचे विभाजन करून नवीन एमआयडीसी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. शुक्रवारी पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा मुहूर्त अखेर सापडला. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवे एमआयडीसी पोलीस ठाणे निर्माण करण्याच्या प्रस्तावाला वर्षभरापूर्वीच शासनाच्या गृह विभागाकडून मंजुरी मिळाली. पोलीस ठाण्यासाठी एमआयडीसीमध्ये दोन हजार चौरस फूट जागासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, ही जागा पोलीस ठाण्यासाठी सोयीची नसल्याचे कारण देत, पोलीस विभागाने शिवणी विमानतळासमोरील जागेची मागणी औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकार्यांकडे केली होती. परंतु, तूर्तास एमआयडीसीतील पोलीस चौकीच्या इमारतीमध्येच नव्या ठाण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. नवीन ठाण्याच्या प्रभारी ठाणेदारपदी साहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांची नियुक्ती करण्यात आली. ठाण्यामध्ये पोलीस कर्मचार्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते व खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक घनश्याम पाटील उपस्थित राहणार आहेत.