पडीक खदानीतील पाण्यावरही एमआयडीसीचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:27 AM2017-09-18T01:27:18+5:302017-09-18T01:29:36+5:30
पाऊस-पाणी नसल्याने अकोला एमआयडीसी तील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने आता एमआयडीसी जवळील पडीक खदानीतील पाण्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे. एमआयडीसीजवळच्या जवळ पास आठ गिट्टी खदानातील पाणी बांधकाम आणि इतर उद्योगांसाठी वापरता येऊ शकते का, याचा विचार आता सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पाऊस-पाणी नसल्याने अकोला एमआयडीसी तील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने आता एमआयडीसी जवळील पडीक खदानीतील पाण्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे. एमआयडीसीजवळच्या जवळ पास आठ गिट्टी खदानातील पाणी बांधकाम आणि इतर उद्योगांसाठी वापरता येऊ शकते का, याचा विचार आता सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीत ८९0 उद्योग सक्रिय आहेत. पैकी केमिकल्स कंपनीसाठी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा वापर होतो. खांबोरा प्रकल्पाच्या पाठोपाठ आता कुंभारी तलावातील पाणीही संपुष्टात येत आहे. दीड-दोन महिन्यानंतर पाणी उपलब्ध न झाल्यास अकोल्यातील शेकडो उद्योगांना ताळे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल बन्सोड यांनी पाण्याचे पर्यायी स्रोत शोधण्याचे काम सुरू केले आहे. एमआयडीसी परिसरातील काही खासगी विहिरींच्या अधिग्रहणासोबतच कुंभारी तलावातील सहा विहिरींचा उ पसा करून त्यांचा व्यास वाढविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्यासमोर ठेवला जात आहे. यासोबत शिवर-शिवणी भागात असलेल्या ३ वेगवेगळ्य़ा खदानी, कृषी विद्यापीठाच्या लगत असलेल्या दोन खदानी, एमआयडीसी परिसरात असलेल्या चार खदानींमध्ये पाणी साचलेले आहे. या खदानींचा वापरही केला जाऊ शकतो. केवळ खाद्य पदार्थांच्या उपयोगात या पाण्याचा वापर केला जाऊ शकत नाही. मात्र एमआयडीसी तील बांधकाम, फायर स्टेशनचे बांधकाम आणि उत्पादित वस्तूंसाठी मात्र खदानीतील पाणी वापरणे शक्य आहे. त्या दिशेनेदेखील अधिकारी विचाराधीन आहेत. या निमित्ताने या खदानीची स्वच्छता होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
गेल्या दोन वर्षाआधीपासून आम्ही एमआयडीसीच्या अधिकार्यांना पाणीची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी निवेदन देत आहोत. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचे प्रयोग सुरू होत आहेत. जीवन प्राधिकरणासह एमआयडीसीने देखील स्वतंत्र पाइपलाइन टाकून ठेवली पाहिजे. याशिवाय येवताजवळच्या तलावाचा वापरही केला पाहिजे.
- कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशन.
एमआयडीसीजवळचा कुंभारी तलाव फार मोठा आहे. त्याची खोली वाढविण्याची गरज आहे. तलावातील गाळ काढून शेतकर्यांना दिल्यास, कुंभारी तलावाची क्षमता आगामी पावसाळ्य़ात वाढू शकते. मात्र, याकडे लक्ष दिले जात नाही. यंदा तशी परिस्थिती निर्माण झाल्याने एमआयडीसी प्रशासनाने पुढाकार घ्यावा; अन्यथा पुन्हा ही समस्या अकोल्यावर येऊ शकते.
-विनीत बियाणी, उद्योजक, एमआयडीसी अकोला.