वाडेगाव परिसरात उडदावर लष्करी अळीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:23 AM2021-08-25T04:23:59+5:302021-08-25T04:23:59+5:30
राहुल सोनोने वाडेगाव : बाळापूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या वाडेगाव परिसरात शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केली आहे; परंतु गत तीन-चार ...
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या वाडेगाव परिसरात शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केली आहे; परंतु गत तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे उडदावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने शेतकरी चिंतित पडला आहे. शेतकरी फवारणीच्या कामात व्यस्त असून, यंदाही उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा शेतकऱ्यांनी नगदी पिकांना पंसती दिली आहे. परिसरात मूग, उडदाचा पेरा वाढला आहे. सध्या पिके बहरली असून, पिके फुलावर आध्त. फुलावर आलेल्या पिकांवर लष्करी अळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. त्यानंतरही पिकांवरील अळी नियंत्रणात येत नसल्याने यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.
----------------------
मी साडेतीन एकारात उडदाची लागवड केली. सद्य:स्थितीत पीक फुलोरा अवस्थेत आहे. पिकावर लष्करी अळीने हल्ला केल्याने चिंता वाढली आहे.
-दीपक घाटोळ, शेतकरी, वाडेगाव.
-----------------------------
वाडेगाव परिसरात पिकांवर विविध अळींचा हल्ला वाढला असून, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
-अनिरुद्ध घाटोळ, युवा शेतकरी, वाडेगाव.