‘कोरोना’च्या संकटात मदर मिल्क बँकेतील दूध संकलन घटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:05 AM2020-07-24T10:05:33+5:302020-07-24T10:05:40+5:30
तीन महिन्यांपासून या बँकेतील दूध संकलनात घट झाल्याने आता दहाऐवजी केवळ दोनच शिशूंना आईचे दूध मिळत आहे.
अकोला : बाळाला जन्म दिल्यानंतर ज्या मातांना पुरेसे दूध नाही, अशा मातांच्या शिशूंसाठी सर्वोपचार रुग्णालयातील मदर मिल्क बँक अमृततुल्यच आहे; पण कोरोनाचा फटका बसल्याने गत तीन महिन्यांपासून या बँकेतील दूध संकलनात घट झाल्याने आता दहाऐवजी केवळ दोनच शिशूंना आईचे दूध मिळत आहे.
शिशूच्या जन्मानंतर अनेक मातांना दूध राहत नाही. अशा नवजात शिशूंना आईच्या दुधातून मिळणारे पोषक तत्त्व मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात अशा शिशूंसाठी मदर मिल्क बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून आजपर्यंत शेकडो चिमुकल्यांचे प्राण वाचले आहेत. मदर मिल्क बँकेच्या माध्यमातून दररोज सरासरी दहा शिशूंना आईचे दूध दिल्या जाते; मात्र जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होताच, त्याचा फटका मदर मिल्क बँकेला बसला आहे. ऐरवी दररोज सरासरी १० शिशूंना या माध्यमातून आईचे दूध मिळायचे, ते आता केवळ दोनवर आले आहे.
म्हणून आईचे दूध आवश्यक
शिशूंची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासह मृत्युदर रोखण्यात आईच्या दुधाचा मोठा वाटा आहे; मात्र कमी दिवसांच्या, कमी वजनाच्या किंवा अति धोका असलेल्या अनेक शिशूंना आईपासून दूर नवजात शिशू दक्षता कक्षात राहावे लागते. अशा बाळांसाठी आईचे दूध महत्त्वाचे ठरते.जीएमसीत घटली प्रसूतीची संख्या
सर्वोपचार रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभाग कोविडसाठी राखीव ठेवल्याने या ठिकाणी प्रसूतीची संख्या घटली आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये केवळ एक किंवा दोन माता दूध दान करत आहेत.
कमी दिवसांचे बाळ किंवा एखाद्या घटनेत आईचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रसंगात मदर मिल्क बँक वरदान ठरली आहे. अनेक दूध दाता माता अतिरिक्त दूध दान करतात. त्यावर प्रक्रिया करून साठवणूक केली जाते; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वोपचारमधील प्रसूती कमी झाल्याने त्याचा परिणाम मिल्क बँकेवर झाला.
- डॉ. विनीत वरठे,
विभाग प्रमुख बालरोगशास्त्र विभाग जीएमसी, अकोला