विद्यार्थ्यांना पोषण आहारात मिळणार दूध भुकटी; प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:19 PM2018-08-24T13:19:15+5:302018-08-24T13:22:16+5:30
अकोला : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील खिचडीसोबतच दूध भुकटी दिली जाणार आहे. प्रत्येक महिन्यात २०० ग्रॅमचे एक पाकिट दिले जाईल.
अकोला : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील खिचडीसोबतच दूध भुकटी दिली जाणार आहे. प्रत्येक महिन्यात २०० ग्रॅमचे एक पाकिट दिले जाईल. प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने हा उपक्रम राज्यभरात राबवण्याचा निर्णय शासनाने २३ आॅगस्ट रोजी घेतला आहे.
शालेय पोषण आहार योजनेमध्ये दूध, दूध भुकटीचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार गुरुवारी त्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार शालेय पोषण आहारास पूरक योजना म्हणून दूध भुकटी वाटप योजना राबवण्यात येत आहे.
इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दूध भुकटी (स्किम मिल्क पावडर) दिली जाईल. विद्यार्थ्यांना एक महिन्याच्या कालावधीसाठी २०० ग्रॅम दूध भुकटीचे पाकिट असे तीन महिन्यांसाठी ६०० ग्रॅमची पाकिटे विद्यार्थ्यांना घरी देण्यात येतील. त्या दूध भुकटीपासून पालकांनी घरी दूध तयार करून देणे अपेक्षित आहे. त्या दूध भुकटीचे एकाच दिवशी वाटप करण्यासाठी वाटप दिवस जाहीर करावा, यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची उपस्थिती राहील. यावेळी दूध तयार करण्याच्या पद्धतीबद्दल पालकांना मार्गदर्शन केले जाईल. राज्यात उत्पादित झालेल्या दूध भुकटीच्या योजनेतून पुरवठा केला जाणार आहे.
- दूध उत्पादक, प्रकल्पांसाठी निर्णय
दूध भुकटी व दुधाची निर्यात करणाऱ्या सहकारी, खासगी संस्थांना अनुक्रमे ५० रुपये प्रति किलो, ५ रुपये लिटर प्रमाणे अनुदान देण्याच्या प्रस्तावावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. त्या प्रस्तावाला १९ जुलै रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार अनुदान देय असलेल्या राज्यातील संस्थांकडून शालेय पोषण आहारांतर्गत दूध भुकटी खरेदी करून वाटप करण्याला मंजुरी देण्यात आली.