अकोल्यात पाच रुपयांनी वधारले दुधाचे भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 04:06 PM2019-08-17T16:06:09+5:302019-08-17T16:06:16+5:30
आता ५५ रुपये लीटरच्या दराने अकोलेकरांना दूध विकत घेण्याची पाळी आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सरकी ढेपचे भाव आटोक्यात येत नसल्याने अखेर पशुपालकांनी स्वातंत्र्य दिनापासून अकोल्यात पाच रुपयांनी दुधाचे भाव वाढविले. पशुपालकांच्या या धोरणात्मक निर्णयामुळे आता ५५ रुपये लीटरच्या दराने अकोलेकरांना दूध विकत घेण्याची पाळी आली आहे.
दुधाळ जनावरांसाठी विदर्भातील सरकी ढेपला विशेष मागणी असते. सरकी ढेपची मागणी लक्षात घेत सटोडियांनी, गत तीन महिन्यांपासून सरकी ढेपचे भाव वाढविले. तीन महिन्यांआधी १८-२५ रुपये किलो विकल्या जाणारी सरकी ढेप आता ३३ -३८ रुपये किलोच्या दराने विकल्या जात आहे. सातत्याने वाढत असलेल्या सरकी ढेपच्या दरवाढीमुळे पशुपालक कमालीचे त्रासले. सरकी ढेपच्या भाववाढीचे कारण समजत नसल्याने अकोल्यातील साडेतीनशे पशुपालकांनी मंगळवार, १३ आॅगस्ट रोजी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बैठक घेऊन दुधाच्या दरात भाववाढ करण्यावर चर्चा केली. त्यानंतर बुधवार, १४ आॅगस्ट रोजी, शेकडो पशुपालकांनी अकोला शहरातून मोटारसायकल रॅली काढून डेअरी संचालकांना अवगत केले. या रॅलीत बाबासाहेब अतकरे, राजू पाटील-गावंडे, सुधीर बंड, नीळकंठ खेडकर, बाळू पाटील खेडकर, विजय दुबे, हरणे, ज्ञानू काळे, विष्णू घटीक, गोविंदा गावंडे, राहुल जायले, गणेशभाऊ, उमाबाई, अक्षय गावंडे, शुभम देशमुख आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते.
अकोला शहर परिसरात दररोज चार हजार लीटर दुधाची विक्री केली जाते. सव्वा दोन लाख रुपयांची दररोजची उलाढाल होते. पुडीच्या दुधाची यात मोजदात नाही. सरकी ढेपच्या दरवाढीची समस्या सोडविल्या न गेल्याने पर्यायाने पशुपालकांना दुधाच्या दरात वाढ करावी लागली.
-राजू गावंडे,
पशूपालक, अकोला.