दूध उत्पादक संस्था संघाची निवडणूक अविरोध !
By admin | Published: June 1, 2015 02:31 AM2015-06-01T02:31:00+5:302015-06-01T02:31:00+5:30
आता लक्ष अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीकडे.
अकोला : जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था संघाची निवडणूक अखेर अविरोध झाली असून, शुक्रवारी आठ उमेदवारांच्या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकार्यांनी केली. ही निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु दूध क्षेत्रात राजकारण नको, याकरिता सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी पुढाकार घेतल्याने ही निवडणूक अविरोध झाली. आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीकडे लागले आहे. येत्या ७ जून रोजी होणार्या जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था संघाच्या निवडणुकीत २0 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत पाच अर्ज बाद झाल्याने रिंगणात १५ उमेदवार होते. परंतु सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी ही निवडणूक अविरोध व्हावी, यासाठीचे प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, आठ उमेदवार अविरोध घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये अकोला तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून ज्योत्स्नना चोरे, आकोट तालुका सर्वसाधारण मतदारसंघातून रमेश भिसे, सर्वसाधारण तेल्हारा तालुका मतदारसंघातून संजय इंगळे, सर्वसाधारण मूर्तिजापूर मतदारसंघातून प्रशांत हजारी, महिला राखीव जिल्हा मतदारसंघातून वंदना आगे, महिला राखीवमधूनच नलिनी लटकुटे, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून जाकीर उल्लाखाँ पटेल साबीर उल्लखा पटेल तर डीटीएनटी अगर विशेष मागासप्रवर्गातून अहेमद शहा कादीर शहा यांचा समावेश आहे. ही निवडणूक अविरोध होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, अनिल पाचडे, हिदायत पटेल, रमेश बोंद्रे, शंकरराव चौधरी यांनी पुढाकार घेतला.