अकोला जिल्ह्यात दूधपूर्णा नावाने मिळणार दूध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 04:39 PM2020-01-03T16:39:38+5:302020-01-03T16:39:45+5:30
जिल्हा परिषद सेसफंडातून समाजकल्याण विभागाच्या एका योजनेत सहा कोटी रुपये निधीतून दूधपूर्णा योजना राबविली जात आहे.
अकोला : जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाकडून दुधाळ जनावरे वाटप योजना राबविण्यात येत असून, योजनेतील लाभार्थींची सहकारी दूध उत्पादक संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे. त्या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यात दूधपूर्णा उपक्रमानुसार त्याच नावाने दुधाची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी बैठकीत नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एच. आर. मिश्रा यांच्यासह जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे उपस्थित होते.
जिल्हा परिषद सेसफंडातून समाजकल्याण विभागाच्या एका योजनेत सहा कोटी रुपये निधीतून दूधपूर्णा योजना राबविली जात आहे. दोन दुधाळ जनावरे देण्यासाठी चिठ्ठीद्वारे सोडतीने ५२१ लाभार्थींची निवड करण्यात आली. योजनेत प्रतिलाभार्थी ८५ हजार रुपये अनुदान दिले जात आहे. चांगल्या दर्जाच्या दोन म्हशी घेण्यासाठी आवश्यकतेएवढी रक्कम बँकेद्वारे कर्ज उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. वाटप झालेल्या लाभार्थींच्या म्हशीचे दर दिवशी दहा ते बारा हजार लीटर दूध संकलन होणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी दूध बँक तयार करण्याचेही आधीच ठरले. लाभार्थींच्या सहकारी दूध संस्थांची नोंदणी करण्यात आली. त्या नोंदणीनुसार लाभार्थींकडून संकलित झालेले दूध या उपक्रमाच्या नावे म्हणजे, दूधपूर्णा नावाने विकले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.