मसाला व्यावसायिकाच्या पुत्राला मागितली पाच लाखांची खंडणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:16 PM2018-12-29T13:16:39+5:302018-12-29T13:16:42+5:30
अकोला: येथील प्रख्यात मसाला व्यावसायिकाच्या पुत्राला मुलीची छेडखानी केल्याच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या युवतीसह पाच जणांविरुद्ध डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला.
अकोला: येथील प्रख्यात मसाला व्यावसायिकाच्या पुत्राला मुलीची छेडखानी केल्याच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या युवतीसह पाच जणांविरुद्ध डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी लल्ल्या ऊर्फ आशिष इंगळे याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.
जुने शहरातील जय हिंद चौकात राहणारा सुबोध सुधीर अभ्यंकर(२४) याच्या तक्रारीनुसार त्याच्या वडिलांचा मसाला विक्रीचा व्यवसाय आहे. सुबोध हा २७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेताकडे जात असताना, त्याला लल्ल्या ऊर्फ आशिष इंगळे(रा. भीम नगर), साक्षी चव्हाण आणि सोबतच्या चार अनोळखी युवकांनी अमानतपूर-ताकोडा रोडवर अडविले आणि त्याला शेतात नेऊन मारहाण केली आणि सुबोधला पाच लाख रुपये देण्याची मागणी केली. अन्यथा, तुझ्याविरुद्ध मुलीची छेड काढल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करू, अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या सुबोधने ही माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी त्याला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी लल्ल्या ऊर्फ आशिष इंगळे, साक्षी चव्हाण आणि चार अनोळखी युवकांविरुद्ध भादंविच्या कलम ३८५, ३८९, ३२३(३४) नुसार गुन्हा दाखल केला. डाबकी रोड पोलिसांनी आरोपी लल्ल्या ऊर्फ आशिष इंगळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. (प्रतिनिधी)