कोट्यवधींची विकास कामे लांबणीवर !

By admin | Published: January 5, 2017 02:34 AM2017-01-05T02:34:11+5:302017-01-05T02:34:11+5:30

महापालिकेला आचारसंहितेचा फटका; दोन महिन्यांपर्यंंत कामे ठप्प.

Millions of development works for a long time! | कोट्यवधींची विकास कामे लांबणीवर !

कोट्यवधींची विकास कामे लांबणीवर !

Next

अकोला, दि. ४- शहरात कोट्यवधींची विकास कामे सुरू होतील, अशी सर्वपक्षीय नगरसेवकांसह अकोलेकरांची अपेक्षा होती. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाची बुधवारी सायंकाळी आचारसंहिता लागू होताच कोट्यवधींच्या विकास कामांवर पाणी फेरल्या गेले आहे. आता किमान दोन महिन्यांपर्यंंत ही सर्व कामे ठप्प पडणार आहेत.
महापालिका प्रशासनाला सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना, दलितेतर योजना, तसेच विशेष रस्ते अनुदानापोटी सुमारे २२ कोटींचा निधी प्राप्त झाला होता.
सर्वपक्षीय नगरसेवकांनी विकास कामांच्या प्रस्तावांमध्ये वारंवार बदल करून प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई केल्याचे परिणाम आचारसंहितेच्या निमित्ताने समोर आले आहेत.
मध्यंतरी या सर्व विकास कामांना प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले होते; परंतु दलितेतर वस्ती योजनेतून होणार्‍या कामांचा विकास आराखडा तयार नसल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव बाजूला सारले. शिवाय नगरोत्थान योजनेत मनपाचा ३0 टक्के हिस्सा जमा करण्यास दिरंगाई झाली. बुधवारी मनपामध्ये आयोजित सर्वसाधारण सभेत कोट्यवधींची विकास कामे मंजूर होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल,अशी अपेक्षा आचारसंहितेमुळे फोल ठरली.

'अमृत'योजना लांबणीवर
मनपाला 'अमृत'योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात प्राप्त ११0 कोटींमधून मनपा प्रशासनाने ८७ कोटी ३५ लाखांची निविदा मंजूर केली. निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मुंबईत बुधवारी राज्य शासनाच्या तांत्रिक समितीसमोर निविदा ठेवली असता, समितीनेदेखील मंजुरी दिली; परंतु आचारसंहिता लागू झाल्याने पाणीपुरवठा वितरण प्रणालीची कामे लांबणीवर गेली आहेत.

'एलईडी'आता मार्चनंतर
शहरात प्रकाशमान पथदिवे लावण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांना शासनाने एलईडी दिव्यांसाठी १0 कोटींचा निधी मंजूर केला. मनपाने १४ व्या वित्त आयोगातून उर्वरित १0 कोटी जमा केले. प्रशासनाने २0 कोटींची निविदा मंजूर केल्यानंतर स्थायी समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा होती. स्थायीने मंजुरी देण्यापूर्वीच आचारसंहिता लागू झाल्यामुळे एलईडीचा लख्ख उजेड आता मार्चनंतरच पडणार, हे निश्‍चित झाले आहे.

अन् उद्घाटन झालेच नाही!
अकोलेकरांच्या सेवेत नवीन सीटी बस दाखल झाल्या. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सिटी बसचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्य़ासाठी भाजपासह शिवसेनेने जय्यत तयारी केली होती. शिवसेनेला डावलून उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यास संबंधित कंपनीला खबरदारीचा इशाराही देण्यात आला होता. आचारसंहितेमुळे बसचे उद्घाटन होणार नसल्याची माहिती आहे.

Web Title: Millions of development works for a long time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.