दोन सराफांना व्यापारी बाप-लेकांनी लाखोंनी गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2017 01:52 AM2017-04-17T01:52:59+5:302017-04-17T01:52:59+5:30
अकोला : अकोल्यात व्यापार करणाऱ्या बाप-लेकांनी अकोल्यातील दोन बड्या सराफांना लाखो रुपयांनी गंडविल्याची घटना उजेडात आली.
अकोला : अकोल्यात व्यापार करणाऱ्या बाप-लेकांनी अकोल्यातील दोन बड्या सराफांना लाखो रुपयांनी गंडविल्याची घटना उजेडात आली असून, आता या बाप-लेकांकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी आटापिटा सुरू आहे.
हिंगणा मार्गावरील बलोदे ले-आऊटमधील व्यापारी बाप-लेकांनी घरात लग्न समारंभ असल्याचे सांगून शहरातील दोन सराफा व्यावसायिकांकडून लक्षावधीचे दागिने खरेदी केले. लक्षावधीचे दागिने खरेदी केल्यानंतर मात्र रक्कम दिली नाही. शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने विश्वास ठेवून सराफांनी दागिने दिलेत; मात्र या घटनेला आता दोन महिने झाले. व्यापारी बाप-लेकांकडून दररोज नवीन कारण सांगितले जात आहे. सिव्हिल लाइन मार्गावरील एका ज्वेलर्स संचालकास तीन लाखांनी तर गांधी चौकातील ज्वेलर्सला दोन लाख रुपयांनी गंडविले. यापैकी केवळ गांधी चौकातील ज्वेलर्स संचालकास या बाप-लेकांनी धनादेश दिला आहे. दुसऱ्या ज्वेलर्स संचालकास मात्र धनादेशही दिलेला नाही. अकोल्यातील काही हुंडीचिठ्ठी व्यावसायिकासही या बाप-लेकांनी लक्षावधीने गंडविल्याचे चित्र समोर आल्याने सराफा व्यावसायिकांचेही डोळे उघडले. या बाप-लेकांच्या घरी आता दोघेही सराफा व्यावसायिक चकरा मारीत आहेत. ज्याच्याकडे धनादेश आहे, त्याने तर धनादेश अनादर प्रकरणाची तयारी सुरू केली; मात्र सिव्हिल लाइन चौकातील सराफा व्यावसायिकाकडे तारण म्हणून काहीच नाही. त्यामुळे बाप-लेकांच्या समाजाच्या एका बड्या बिल्डर्सच्या मध्यस्थीने या सराफाने लक्षावधीची ही रक्कम काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही रक्कम सरळ मार्गे निघाली नाही, तर सराफा व्यावसायिकांनी शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांच्या मध्यस्थीने रक्कम काढण्याची वेळ येईल. व्यापारी बाप-लेकांकडे घराशिवाय दुसरे कोणतेही भांडवल नसल्याने आता दिलेले कर्ज वसूल करणे जोखमीचे झाले आहे. हुंडीचिठ्ठी व्यावसायिक आणि सराफांना आपल्या रक्कम वसुलीत किती यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.