हॉलिडे टूरच्या नावाखाली अकोलेकरांची लाखो रुपयांची फसवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 12:26 PM2022-05-11T12:26:43+5:302022-05-11T12:28:16+5:30
Cheated in the name of holiday tour : एका हॉटेलमध्ये हॉलिडे टूर फॅमिली पॅकेजच्या नावाखाली एक प्रमोशन कार्यक्रम घेण्यात आला होता.
अकोला : हॉलिडे टूरच्या नावाखाली तीन भामट्यांनी अकोलेकर नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करून पोबारा केल्याची बाब मंगळवारी समोर आली. या प्रकरणात टूर्स पॅकेज बुक करणाऱ्या काही नागरिकांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आणखी काही तक्रारीसुद्धा पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.
अकोल्यात एका हॉटेलमध्ये हॉलिडे टूर फॅमिली पॅकेजच्या नावाखाली एक प्रमोशन कार्यक्रम घेण्यात आला होता. ७ एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमात १०० च्यावर अकोलेकर नागरिकांनी हजेरी लावली होती. उपस्थित नागरिकांना तथाकथित कंपनीचे संचालक असलेल्या तिघाजणांनी ७५ हजार रुपये भरण्यास सांगितले आणि त्या बदल्यात प्रवाशांना हॉलिडे टुर्समध्ये सर्व सुविधा पुरविण्यात येतील, असे आश्वासन दिले. कंपनीच्या तथाकथित संचालकांच्या भूलथापांना बळी पडत काही नागरिकांनी पैसे भरले. मात्र, अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही टूर्सबाबत काही माहिती दिली जात नसल्याने नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आतापर्यंत दहाजणांनी खदान पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
अशी केली फसवणूक
सेव्हन स्टार गोल्डन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या नावाखाली मुंबईतील तिघाजणांनी अकोल्यातील वेगवेगळ्या कार-शोरूममधून कार खरेदी करणाऱ्यांचे मोबाईल नंबर मिळविले. त्यानंतर त्यांना टूर पॅकेजबाबतची माहिती पाठवून आणि फोनवर माहिती देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितले. ७ एप्रिल रोजी एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात टूरबाबत माहिती देण्यात आली. तीन वर्षांकरिता प्रत्येक वर्षी सहा रात्र, सात दिवसांच्या पॅकेजसाठी ७५ हजार रुपये सांगण्यात आले. यातील ३० ते ३७ हजार रुपयांपर्यंत रक्कम काही नागरिकांनी भरली. त्यानंतर या तिघांनी पैसे भरणाऱ्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही.
तीन वर्षांसाठी हॉलिडे टूर पॅकेजच्या नावाखाली फसवणूक झालेल्या काही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. आरोपींचे मोबाईल नंबर ट्रेस करण्यात आले असून, ते मुंबई व कल्याण पसिरात असल्याचे दाखवीत आहेत.
- श्रीरंग सणस, ठाणेदार खदान पोलीस स्टेशन