‘एमआयडीसी’तील भूखंड वाटपात कोट्यवधींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:35 PM2020-01-05T12:35:34+5:302020-01-05T12:35:42+5:30

भूखंडाची कागदपत्रे आगीत जळाल्याचाही बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव चौकशी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर या पाचही बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Millions of scams in the allotment of land in Akola 'MIDC' | ‘एमआयडीसी’तील भूखंड वाटपात कोट्यवधींचा घोटाळा

‘एमआयडीसी’तील भूखंड वाटपात कोट्यवधींचा घोटाळा

googlenewsNext

अकोला: एमआयडीसीच्या क्षेत्रीय अधिकारी दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांनी संगनमत करून भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करीत खोट्या व बनावट नोंदी करून कोट्ट्यवधींच्या भूखंडाचे बेकायदेशीर वाटप करीत घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या भूखंडाची कागदपत्रे आगीत जळाल्याचाही बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव चौकशी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर या पाचही बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, तिघे फरार आहेत.
अकोला एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक टीए ७८, टीए ४६, एन १५४, एन १६० या भूखंडाच्या वाटपामध्ये तसेच मुदतवाढ प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रादेशिक अधिकारी कुंदा किशोर वासनिक रा. गणपती नगर लॉर्ड्स होस्टेलजवळ अमरावती, अमरावतीचे तत्कालीन क्षेत्र व्यवस्थापक दिलीप चेंडुजी पाटील रा. उमरेड जि. नागपूर, अमरावतीचे अतिरिक्त कार्यभार क्षेत्र व्यवस्थापक गजानन भास्कर ठोके रा. साई नगर मंदिराजवळ अमरावती, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता अविनाश रूपराव चंदन रा. दत्तकृपा सुधीर कॉलनी विवेकानंद आश्रम शाळेजवळ अकोला व अमरावती एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक पुरुषोत्तम मारुतराव पेटकर रा. मानेवाडा रोड नागपूर या पाच बड्या अधिकाºयांविरुद्ध एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुळके यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व अधिकाºयांनी संगनमत करून महामंडळाचे आर्थिक नुकसान केले. तसेच स्वत:च्या फायद्यासाठी नियमबाह्य कृत्य करून बनावट दस्तऐवज तयार केले व ते दस्तऐवज खरे असल्याचे सांगून फसवणूक केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. भूखंड क्रमांक टीए ७८ या भूखंडाचे वाटप उर्वरित अधिमूल्याची रक्कम न भरताच भूखंडाची नस्ती तयार केली व खोट्या व बनावट नोंदी करून आवक-जावक रजिस्टरच आरोपींनी गहाळ केले. त्यानंतर २५ डिसेंबर २०१७ रोजी कागदपत्रे कार्यालयाला लागलेल्या आगीत जळाल्याचे सांगितले. एक हजार चौरस मीटरचा भूखंड वाटपपत्राद्धारे श्रीमती कृपा शहा मे श्री कृपा लाजिस्टिक यांना करण्यात आले. यावेळी भूखंडाच्या वाटपावेळी सहायक क्षेत्र व्यवस्थापक अविनाश चंदन होते. त्यांनी तीन लाख रुपयांचा भरणा करून न घेताच भूखंडाचे वाटप केल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. यावरून सर्व अधिकाºयांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्रिसदस्यीय समितीने केली चौकशी
आरोपींनी भूखंडाचे वाटप करतेवेळी टिपणी सादर केली. तसेच भूखंडाच्या वाटपपत्रावर खाडाखोड केली असून, वाटपपत्र बनावट असल्याचे दिसून आले. तसेच वाटपपत्र ज्या काळात निर्गमित करण्यात आले, त्या काळातील आवक-जावक रजिस्टर हे कार्यालयातून गहाळ केले. या भूखंडासंदर्भात कुंदा वासनिक यांनी १४ आॅगस्ट २०१७ रोजी भूखंडधारकासोबत गैरकायदेशीर करारनामा केला, असे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीत समोर आले.

Web Title: Millions of scams in the allotment of land in Akola 'MIDC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.