व्यापा-यांना कोट्यवधींना गंडवणारा गजाआड
By admin | Published: January 21, 2017 08:54 PM2017-01-21T20:54:31+5:302017-01-21T20:54:31+5:30
एलईडी टिव्ही लावून देण्याच्या नावावर जिल्ह्यातील व्यापा-यांना १ कोटी ३३ लाख ५५ हजार रूपयांना फसविणा-या खासंगी कंपनीच्या प्रक्षेत्र व्यवस्थापकाला शनिवारी अकोला पोलिसांनी गोंदिया येथून अटक केली.
Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 21 - एलईडी टिव्ही लावून देण्याच्या नावावर जिल्ह्यातील व्यापा-यांना १ कोटी ३३ लाख ५५ हजार रूपयांना फसविणा-या खासंगी कंपनीच्या प्रक्षेत्र व्यवस्थापकाला शनिवारी अकोला पोलिसांनी गोंदिया येथून अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.
शहरासह जिल्ह्यातील व्यापारी व उद्योजकांना त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये एलईडी टीव्ही लावून देऊन त्यावर जाहिरात आल्यानंतर कमिशन देण्याच्या नावाखाली सुमारे १ कोटी २३ लाख ५५ हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा एप्रिल २०१५ मध्ये खदान पोलिसांनी दाखल केला होता. या फसवणूक प्रकरणातील आरोपी चित्रांग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या एरिया मॅनेजरला खदान पोलिसांनी शनिवारी गोंदिया येथून अटक केली.
चित्रांग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शहरातील व्यापारी व उद्योजकांना ३५ हजार रुपये जमा ठेव ठेवून त्यांच्या प्रतिष्ठानामध्ये एलईडी टीव्ही लावण्याचे आमिष दाखविले होते. सदर प्रतिष्ठानामध्ये टीव्ही लावल्यानंतर त्यावर २४ तास विविध कंपनी आणि प्रतिष्ठानांच्या जाहिराती येणार असून, त्या माध्यमातून दर महिन्याला कमिशन देण्याचेही आमिष यावेळी कंपनीने व्यापारी व उद्योजकांना दाखविले.
या आमिषाला बळी पडत अकोल्यातील तब्बल ३५० च्यावर व्यापारी उद्योजकांनी प्रत्येकी ३५ हजार रुपये भरल्यानंतर सुमारे १ कोटी २३ लाख ५५ हजार रुपयांचे एलईडी टीव्ही या कंपनीचा एरिया मॅनेजर शैलेंद्रसिंह चव्हाण याच्याकडून खरेदी केले होते. यामध्ये तक्रारकर्ता देवानंद बागडे यांनीही १ लाख ७५ हजार रुपयांची रोख ठेवी ठेवून अकोला जिल्ह्याचे वितरक म्हणून काम सुरू केले होते; मात्र यामध्ये त्यांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस स्टेशनमध्ये केली.
पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवल्याने बागडे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खदान पोलिसांनी १ एप्रिल २०१५ रोजी चित्रांग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक माथूर, एरिया मॅनेजर शैलेंद्रसिंह चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. यावरून खदान पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४०९, ४६८,४७१ नुसार गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला; मात्र एकाचाही पत्ता नसल्याने आरोपींचा शोध लागत नव्हता. शनिवारी खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनातील पथकाने शैलेंद्रसिंह चव्हाण यास गोंदिया येथून अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.