प्रणिती शिंदे यांना एमआयएमची नोटीस
By Admin | Published: November 8, 2014 11:18 PM2014-11-08T23:18:59+5:302014-11-08T23:18:59+5:30
माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा.
अकोला- सोलापूरच्या (मध्य) आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांना ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुसलमीनच्यावतीने (एमआयएम) शनिवारी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. आ. शिंदे यांनी एमआयएम नेत्यांची भाषणे देशविरोधी असल्याचे वक्तव्य केले होते.
एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात बुधवार दि. ५ नोव्हेंबर रोजी आ. प्रणिती शिंदे यांनी एमआयएमविरुद्ध बोलताना या पक्षाच्या नेत्यांची भाषणे ऐकली तर ते देशविरोधक वाटतात. त्यामुळे या पक्षावर कायमची बंदी आणण्यात यावी, अशी मागणी केली होती. एमआयएमला देशद्रोही म्हणणार्या आ. शिंदे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी एमआयएम नेते खासदार अससुद्दीन ओवैसी यांनी केली होती. माफी मागण्यास आ. शिंदे यांनी नकार दिल्याने अखेर खा. ओवैसी यांच्यावतीने शनिवारी आ. प्रणिती शिंदे यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. या नोटीसद्वारे आ. शिंदे यांनी नोटीस मिळताच त्यांच्या वक्तव्याबाबत प्रसार माध्यमांमधून जाहीर माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. माफी न मागितल्यास आ. शिंदे यांच्याविरोधात न्यायालयीन आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे अँड. खिजर पटेल आणि खा. ओवैसी यांच्यातर्फे अँड. कादरी अन्वर यांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.