मेळघाटातील चिमुकल्यांना मायेची ऊब..!
By admin | Published: December 19, 2014 01:03 AM2014-12-19T01:03:16+5:302014-12-19T01:03:16+5:30
वाशिमकरांनी पाठविले ऊबदार कपडे.
वाशिम : कडाक्याच्या थंडीने गारठत असलेल्या मेळघाटातील तारुबांदा येथील आदिवासी कुटुंबांतील ५00 चिमुकल्यांना वाशिमच्या सद्गृहस्थांनी स्वेटर व ऊबदार कपड्यांच्या माध्यमातून मायेची ऊब दिली आहे.
गत तीन-चार दिवसांपासून वातावरणात गारठा अधिकच वाढला आहे. परिणामी थंडीपासून संरक्षण म्हणून स्वेटर, र्जकिन, हातमोजे, कानटोपी आदी गरम व ऊबदार कपड्यांचा सर्व जण आधार घेत आहेत. अशावेळी मेळघाटातील तारुबांदा या ३00 लोकवस्तीच्या खेड्यातील गोरगरीब चिमुकल्यांना ऊबदार कपड्यांविना थंडीतच कुडकुडत राहावे लागत असल्याची बाब वाशिम येथील समाजसेवकांना माहीत झाली. क्षणाचाही विलंब न लावता शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलचे संस्थापक मुकेश चरखा, स्वर्गीय डॉ. के. व्ही. जिरोणकर स्मृती संस्थेचे डॉ. सुधाकर जिरोणकर, वाशिमचे जिल्हा कोषागार अधिकारी प्रकाश राठोड, धनुर्विद्या संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक अनिल थडकर, सामाजिक कार्यकर्ते राजू बजाज आदींनी जवळपास ५00 स्वेटरची स्वखर्चातून व्यवस्था केली. या सर्वांनी मेळघाटातील तारुबांदा गाव गाठले.
गावात चारचाकी गाडी येताच सर्व जण कुतूहलाने गाडीभोवती येऊ लागले. कुणीतरी ह्यसाहेबह्ण आले, असा संदेश संपूर्ण गावभर पसरला. साहेब कशासाठी आले, याची कुजबुज सुरू झाली. गावातील शाळेजवळ सर्वांना बोलाविण्यात आले आणि गाडीमधील चिमुकल्यांसाठी आणलेले स्वेटर बाहेर काढले. चिमुकल्यांसोबत हितगूज साधत ५00 स्वेटरचे वितरण करण्यात आले. मेळघाटातील चिमुकल्यांना स्वेटरचे वितरण करून वाशिमकरांनी आदर्श पायंडा पाडला आहे. वाशिमकरांच्या या उपक्रमातून इतरांनी प्रेरणा घेतल्यास मेळघाटातील इतर ठिकाणच्या चिमुकल्यांही ऊबदार कपड्याच्या माध्यमातून मायेची ऊब मिळू शकेल.