नादुरुस्त खासगी प्रवासी बसला मिनीट्रकची धडक; चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 17:26 IST2019-08-25T17:25:27+5:302019-08-25T17:26:09+5:30
अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर कुरूम नजीक घडली.

नादुरुस्त खासगी प्रवासी बसला मिनीट्रकची धडक; चार जखमी
कुरूम : नादुरुस्त खासगी प्रवासी बसला आयशर ट्रकने मागून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर कुरूम नजीकच्या राजस्थानी धाब्या जवळ रविवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली.
गंभीर जखमीमध्ये आयशर ट्रकच्या दोन तर किरकोळ जखमीमध्ये ट्रॅव्हल बसच्या व ट्रकच्या प्रत्येकी एका चालकाचा समावेश आहे.
प्राप्त माहितीवरून औरंगाबाद वरून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस क्र.एम एच २० डी.डी.०७७० या बसचा राजस्थानी धाब्यानजीक समोरचा टायर पंचर झाल्याने रोडवर उभ्या स्थितीत होती.यावेळी बस चालक व्यंकटेश मनोहर पतंगे वय ३० वर्ष रा.औरंगाबाद हा पंचर बसचा जॅक लावून टायर काढत असतांना याच दरम्यान कानपुर वरून मिरची घेऊन नागपूरला जाणारा आयशर ट्रक क्र.यु पी ७८ एफ ऐन ०६७९ च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपने चालवून उभ्या पंचर ट्रॅव्हल बसला जबर धडक दिली. यात आयशर ट्रकचे दोन चालक गंभीर तर एक चालक किरकोळ जखमी झाला. तर पंचर ट्रॅव्हल्स बसचा चालक व्यंकटेश मनोहर पतंगे वय ३० वर्षे हा जॅक बसवितांना टायर घासल्याने जखमी झाला.सुदैवाने बस पंचर असल्यामुळे सर्व प्रवाशी खाली उतरले होते त्यामुळे पुढील अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच माना पोलीस व कुरूम चौकीचे पोलीस व गृहरक्षक घटनास्थळी दाखल होऊन आयशर ट्रकच्या कॅबिन मध्ये फसलेल्या तीन पैकी दोन गंभीर जखमी चालकांना पोलिसांनी काढून रुग्णवाहिकेने अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले तर किरकोळ जखमी एका चालकाला व ट्रॅव्हल्स बसच्या चालकाला रुग्णवाहिकेने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले.या अपघातात आयशर ट्रकच्या कॅबिनचे व बसच्या मागच्या बाजूला मोठे नुकसान झाले आहे.वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल व्हायचा होता.आयशर ट्रक मधील गंभीर व किरकोळ जखमी चालकाचे नाव अद्याप कळू शकले नाही.