गौण खनिज घोटाळ्याचे होणार ‘उत्खनन’!
By admin | Published: June 1, 2015 02:36 AM2015-06-01T02:36:30+5:302015-06-01T02:42:08+5:30
मूर्तिजापूर तालुक्यातील कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिज घोटाळ्याची प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा चौकशी होणार.
गणेश मापारी / मूर्तिजापूर : तालुक्यातील कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिज घोटाळ्याची प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा चौकशी होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक अधिकार्यांकडून मोजमाप करण्यात येणार असून, याबाबतचे पत्र जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे ई-क्लास जमिनीतील गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून कोट्यवधी रुपये लाटणार्यांचे धाबे दणाणले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा येथील गट क्रमांक २९५, २८0 व २४८ या ई-क्लास जमिनीवरील नाल्यांमधून गौण खनिजाचे अवैध उत्खनन करण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाकडे तक्रारीही सादर केल्या होत्या. अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असून, ग्रामस्थही त्रस्त झाले होते. त्यामुळे ग्रामस्थ कारवाई होण्यासाठी आग्रही होते. मात्र कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी उपोषणही केले होते. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाची महसूल प्रशासनाला दखल घ्यावी लागली. परिणामस्वरूप अवैध उत्खननाची चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीनंतरही ठोस कारवाई झाली नाही. चौकशीत एकूण खोदकामापैकी जुने खोदकाम किती, ही बाब स्पष्ट होऊ शकत नाही, हे कारण पुढे करीत तहसील कार्यालयाने जिल्हा खनिकर्म अधिकार्यांकडून मार्गदर्शन मागितले. आता लवकरच खोदकामाचे मोजमाप होणार असून, चौकशीतून नेमका किती महसूल बुडाला आणि घोटाळ्यातील लाभार्थी कोण आहेत, हे स्पष्ट होईल. याबाबत प्रयत्न करूनही तहसीलदार मालठाणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.