राज्याची ट्रॅव्हल ई-पास यंत्रणा दिशाभूल करणारी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 06:13 PM2020-05-05T18:13:09+5:302020-05-05T18:13:20+5:30
राज्याच्या ट्रॅव्हल ई-पास यंत्रणेवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, अशी तक्रार बजरंग दलाचे सूरज भगेवार यांनी केली आहे.
अकोला: लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्याच्या ट्रॅव्हल ई-पास यंत्रणेवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, अशी तक्रार बजरंग दलाचे अकोला विभाग संयोजक सूरज भगेवार यांनी एका पत्रकान्वये केली आहे. राज्य शासनाने ट्रॅव्हल ई-पास यंत्रणा सुरू केली; मात्र ती कुचकामी असल्याचे समोर येत आहे. इतर राज्यात तीन तासांत ई-पास दिल्या जात आहे. महाराष्ट्रात मात्र तीन दिवस होऊनही कुणी अधिकारी दखल घेत नाही. महाराष्ट्र सरकारच्या ट्रॅव्हल ई-पास पोर्टलवर अनेकदा माहिती देऊनही त्यावर प्रतिसाद मिळत नाही. तीन दिवस झाल्यानंतरही कोणतीही विचारणा होत नाही. वास्तविक पाहता एखाद्या इमर्जन्सी प्रवासाकरिता अर्ज करताच ट्रॅव्हल ई-पास दिली गेली पाहिजे; मात्र पोर्टलवरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने यामध्ये सुधारणा करावी आणि नागरिकांची अवहेलना थांबवावी, अशी मागणीही बजरंग दलाच्यावतीने करण्यात येत आहे.