अर्ज चुकला की चुकविला, आंबेडकरांची शांतता वादळापूर्वीची ?
By राजेश शेगोकार | Published: November 11, 2021 10:42 AM2021-11-11T10:42:59+5:302021-11-11T10:45:46+5:30
Prakash Ambedkar : पहिल्या दिवशी त्यांनी ‘अर्ज’ या विषयावर काहीही चर्चा केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अकाेला : जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवाराचा ‘अर्ज चुकला की चुकविला’ यावर वंचितने घेतलेल्या ‘ओपन ट्रायल’नंतर राजकीय वर्तुळात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. या पृष्ठभूमीवर ॲड. आंबेडकर मंगळवारी रात्री अकाेल्यात दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या सुकाणू समितीसह काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली असून, या भेटीत ‘अर्ज चुकला की चुकविला’ यावर काहीच चर्चा न झाल्याने आंबेडकरांची शांतता वादळापूर्वीची आहे का? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
वंचितकडून महिला व बाल कल्याण आणि विषय समिती सभापती पदासाठी याेगिता राेकडे, संगीता अढाऊ यांची नावे अंतिम करण्यात आली हाेती. अर्ज दाखल करताना या दाेन्ही उमेदवारांचा अर्ज महिला व बाल कल्याण समितीसाठीच दाखल झाल्याने विषय समिती सभापतीसाठी अपक्ष उमेदवार सम्राट डाेंगरदिवे यांचा एकमेव अर्ज कायम राहिल्याने ते अविराेध विजयी झाले. दुसरीकडे महिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीसाेबत मतदान केल्याने वंचितचा पराभव झाला. वंचितसाठी दाेन्ही पराभव धक्कादायक ठरले असून, हा प्रकार घडला की घडवून आणला याबाबत सध्या आराेप-प्रत्याराेप सुरू आहेत. वंचितने सत्यशाेधनासाठी घेतलेली बैठक ओपन ट्रायल ठरली असून, यामध्ये थेट आराेप-प्रत्याेरापासह बाजू मांडण्याचाही प्रकार घडला. या बैठकीनंतर वंचितच्या वर्तुळात संशयकल्लाेळचा प्रयाेग सुरू असल्याने ॲड. आंबेडकर यांचे अकाेल्यात आगमन झाल्यावर याबाबत निर्णय हाेईल अशी चर्चा हाेती. मात्र ,पहिल्या दिवशी त्यांनी ‘अर्ज’ या विषयावर काहीही चर्चा केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आंबेडकर हे रविवारपर्यंत अकाेल्यात असल्याने त्यांची भूमिका काय समाेर येते यावर जिल्हा परिषदेसह वंचितच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.