हरवलेला मूकबधिर मुलगा नातेवाइकांकडे सुपुर्द; आधार कार्ड नोंदणीतून सापडला पत्ता
By रवी दामोदर | Published: May 20, 2024 03:08 PM2024-05-20T15:08:13+5:302024-05-20T15:08:34+5:30
कुटुंबीयांनी व्यक्त केले आभार, साधारणत: १८ वर्षांचा मात्र, मूकबधिर असल्याने त्याचा मूळ पत्ता शोधून काढणे, हे आव्हान होते.
अकोला : उत्तर प्रदेशातून हरवलेला एक मूकबधिर मुलगा बाळापूर पोलिसांना सापडला. महिला व बालविकास विभागाने त्याची आधार नोंदणी करून पत्ता शोधून काढला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. २० मे) त्याला नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आले.
साधारणत: १८ वर्षांचा मात्र, मूकबधिर असल्याने त्याचा मूळ पत्ता शोधून काढणे, हे आव्हान होते. त्याला आधार कार्ड दाखविण्यात आले. तेव्हा त्याने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर शोध प्रक्रियेला वेग मिळाला. त्याची आधार नोंदणी केली असता नोंदणी रद्द झाल्याचा संदेश संजय मोटे यांना मोबाइलवर प्राप्त झाला. जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे सुनील लाडूलकर यांनी आधारचे ग्राहक सेवा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क केला असता बालकाचे पूर्वीचे आधार कार्ड असल्यामुळे त्याची नव्याने नोंदणी रद्द झाल्याची माहिती समोर आली. तक्रार दाखल केल्यानंतर पूर्वीचा नामांकन क्रमांक प्राप्त झाला. त्यानंतर बालकाच्या बोटांचे ठसे घेऊन पूर्वीचे आधार कार्ड डाउनलोड करण्यात आले. बालकाचा पत्ता उत्तर प्रदेश राज्यातील प्रतापगढ जिल्ह्याचा असल्याचे समोर आले. त्यावेळी तातडीने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्यात आला. आपला मुलगा सुखरूप असल्याचे कळताच कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या मुलाचे भाऊजी रवींद्र पाल हे सोमवारी अकोल्यात उपस्थित झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याला त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यांचे लाभले सहकार्य
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनिता गुरव, राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, शीला तोष्णीवाल, डॉ. विनय दांदळे यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया राबविण्यात आली. अधीक्षक जयश्री हिवराळे, संजय मोटे, चाइल्डलाइनच्या समुपदेशक शरयू तळेगावकर, अनिल इंगोले, प्रमोद ठाकूर, नितेश शिरसाट यांचे सहकार्य लाभले.