कर्नाटकातील निल्लमाची दोन वर्षांनंतर झाली कुटुंबीयांसोबत भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:43 PM2018-11-02T13:43:32+5:302018-11-02T13:44:17+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये दोन महिन्यांपासून उपचारासाठी दाखल असलेल्या एका अनोळखी महिलेला तब्बल दोन वर्षांनंतर गुरुवारी तिच्या कुटुंबीयांची भेट झाली.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये दोन महिन्यांपासून उपचारासाठी दाखल असलेल्या एका अनोळखी महिलेला तब्बल दोन वर्षांनंतर गुरुवारी तिच्या कुटुंबीयांची भेट झाली. सर्वोपचार रुग्णालयातल अधिकारी व कर्मचाºयांच्या प्रयत्नामुळे दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली महिला कुटुंबीयांना भेटली.
सर्वोपचार रुग्णालयाममध्ये गत दोन महिन्यांपासून एक अनोळखी महिला रुग्ण उपचाराकरिता दाखल होती. सदर महिलेला मराठी भाषा येत नसल्यामुळे तिच्याशी संवाद साधणे कठीण झाले होते; मात्र त्यातही सर्वोपचार रुग्णालयातील कार्यरत समाजसेवा अधीक्षक विनायक साखरे यांनी महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ती महिला कन्नड भाषा बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर कन्नड भाषा येत असलेल्या एका व्यक्तीला सोबत घेऊन महिलेसोबतच संवाद साधण्यात आला. तिचा विश्वास संपादन करण्यात आला व त्यानंतर तिची चौकशी केली असता तिचे नाव निल्लमा असल्याचे तिने सांगितले. यासोबतच ती कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील चितापूर तालुक्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या यरगल या गावातील रहिवासी असल्याचे तिने सांगितले. यावरून साखरे यांनी गुलबर्गा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून चीतापूर तालुका ठाणेदार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी सदर महिलेची माहिती चितापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिली. ठाणेदारांनी तिचा व्हॉट्स अॅपवर फोटो बोलावून माहिती घेतली असता सदर महिला यरवल येथील असल्याची माहिती समोर आली. सदर महिला ही गत दोन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले व तिचा दोन वर्षांपासून शोध घेण्यात येत होता; मात्र तिचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने कुटुंबीय परेशान झाले होते. अशातच सदर महिला अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने अकोला गाठले. दोन वर्षांपासून ताटातूट झालेल्या निलम्मा व तिच्या कुटुंबीयांची गुरुवारी रुग्णालयात भेट झाली. यासाठी कुटुंबीयांना सोबत पुन्हा जोडण्यासाठी सर्व रुग्णालयातील उमेश रामटेके, अधीक्षक शिरसाट यांनी मोलाचे सहकार्य केले.