तब्बल ४० दिवसांनी सापडला बेपत्ता कोविडग्रस्त मनोरुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:39 AM2020-09-26T10:39:31+5:302020-09-26T10:39:50+5:30
सिटी कोतवाली पोलिसांनी त्या मनोरुग्णाला शुक्रवारी ताब्यात घेऊन मानसोपचार रुग्णालयाकडे हस्तांतरीत केले.
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात कोरोेनाच्या उपचारासाठी दाखल मनोरुग्ण १५ आॅगस्टपासून रुग्णालयातून बेपत्ता झाला होता. तब्बल ४० दिवसांनी हा रुग्ण सिंधी कॅम्प परिसरात आढळून आला. सिटी कोतवाली पोलिसांनी त्या मनोरुग्णाला शुक्रवारी ताब्यात घेऊन मानसोपचार रुग्णालयाकडे हस्तांतरीत केले.
अमरावती जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले ५१ वर्षीय अविनाश लोखंडे यांच्यावर मागील पाच वर्षांपासून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. केळकर यांच्याकडे उपचार सुरू होता. मनोरुग्ण अविनाश यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र १५ आॅगस्ट रोजी ते अचानक बेपत्ता झाले होते. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. रुग्णाचा घातपात झाल्याची शंकाही त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत होती. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या बेपत्ता मनोरुग्णाला शोधणे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. तपास सुरू असताना शुक्रवारी सिटी कोतवाली पोलिसांना बेपत्ता मनोरुग्ण सिंधी कॅम्प परिसरात असल्याची माहिती फोनवरून एका व्यक्तीने दिली. माहिती मिळताच पोलिसांनी सिंधी कॅम्प परिसरात धाव घेत संबंधित मनोरुग्ण हा अविनाश लोखंडे असल्याची खात्री केली. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नेले व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. केळकर यांच्याकडे सुपुर्द केल्याची माहिती सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी दिली.