तीन वर्षांपासून बेपत्ता महिला कोलकात्यात सापडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:39 PM2019-02-02T13:39:24+5:302019-02-02T13:39:38+5:30
अकोला: तीन वर्षांपूर्वी कोलकाता महानगरातील रस्त्यावर बेवारस स्थितीत पडलेली एक ३0 वर्षीय महिला आढळून आली होती. तेथील ईश्वर संकल्प सेवा केंद्राच्या सदस्यांनी तिला केंद्रात आणले.
अकोला: तीन वर्षांपूर्वी कोलकाता महानगरातील रस्त्यावर बेवारस स्थितीत पडलेली एक ३0 वर्षीय महिला आढळून आली होती. तेथील ईश्वर संकल्प सेवा केंद्राच्या सदस्यांनी तिला केंद्रात आणले. तिच्यावर उपचार केल्यावर तिने तिचे नाव संगीता दत्ताभाऊ हिंगमिरे असून, ती अकोल्यात राहणारी असल्याचे सांगत आहे. ईश्वर संकल्प संस्थेला संगीता कुठे राहणारी आहे, हे सापडले आहे; परंतु तिचे कुटुंबीय शोधण्याचे आव्हान पुढे ठाकले आहे.
२0१६ मध्ये कोलकोता महानगरातील रस्त्यावर बेवारस आणि आजारी स्थितीत संगीता दत्ताभाऊ हिंगमिरे ही महिला ईश्वर संकल्प सेवा केंद्राच्या सदस्यांना आढळून आली. या सदस्यांनी तिला कोलकात्यातील ईश्वर संकल्प सेवा केंद्रात आणले. या ठिकाणी तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यावेळी तिला सिझोफोमिया आजार असल्याचे निदान झाले. एक वर्षाच्या उपचारानंतर तिने तिचे नाव संगीता असल्याचे सांगितले. ती मराठी भाषा बोलते. संगीताला संस्थेने हस्तकला, शिवणकामाचे प्रशिक्षणसुद्धा दिले. तिच्या आधारकार्डवरसुद्धा संगीता दत्ताभाऊ हे नाव असल्याचे समोर आले आहे. संगीताने तिच्या पतीचे नाव सतीश असून, तो जयपूरला राहत असल्याचे सांगितले. एवढेच नाही, तर तिच्या पतीने तिला रस्त्यावर बेवारस सोडून पलायन केले होते. तिच्या माहितीनुसार ईश्वर संकल्प सेवा केंद्राच्या सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने पतीचा शोध घेतला; परंतु त्याने तिच्यासोबत संबंध असल्याचे नाकारले आहे. त्यामुळे आता सेवा केंद्राचे सदस्यांनी तिच्या माहेरचा पत्ता विचारला असता संगीता तिचे माहेर अकोल्यातील असल्याचे सांगत आहे. एवढेच नाही, तर वडिलांचे नाव दत्ताभाऊ, आईचे नंदाबाई, भावाचे नाव राजू हिंगमिरे असल्याचे सांगत आहे. वडील कारपेंटर आहेत. या माहितीच्या आधारे ईश्वर संकल्प सेवा केंद्राचे सदस्य व पोलीस संगीताच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत; परंतु तिचे कुटुंबीय कोठे राहतात, याची माहिती मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. तिचे कुटुंबीय मिळाल्यास निराधार संगीताला घर मिळेल. नागरिकांनीसुद्धा यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ईश्वर संकल्प सेवा केंद्राने केले आहे. (प्रतिनिधी)
संगीता नामक महिला कोलकाता शहरात बेवारस स्थितीत सापडली. तिच्यावर आम्ही वैद्यकीय उपचार केले. ती मराठी भाषा बोलते. अकोल्याची राहणारी असल्याचे ती सांगते. तिच्या कुटुंबीयांचा शोध लागल्यास तिला आधार मिळेल.
-तपन प्रधान, सदस्य,
ईश्वर संकल्प सेवा केंद्र कोलकाता.