मिशन अॅडमिशन: केंद्रीय प्रवेश पद्धतीनेच अकरावीचे प्रवेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:43 PM2019-05-14T12:43:39+5:302019-05-14T12:43:44+5:30
सलग तिसऱ्या वर्षी माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने केंद्रीय प्रवेश पद्धतीने आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अकोला: शहरातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी विज्ञान शाखेच्या एकूण ८ हजार जागा आहेत. या जागांवर सलग तिसऱ्या वर्षी माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने केंद्रीय प्रवेश पद्धतीने आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गतवर्षात जिल्ह्यात १४ हजार विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली होती. यंदासुद्धा तीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रवेशपत्र व डोनेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट थांबविण्याच्या दृष्टिकोनातून दोन वर्षांपासून शहरात अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सुरू केली आहे. विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे कल वाढलेला असल्यामुळे सर्व महाविद्यालयांनी विज्ञान शाखेचा जागा, तुकड्या वाढवून घेतल्या आहेत. गतवर्षी कनिष्ठ महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेच्या ३,३00 जागा रिक्त राहिल्या होत्या. शहरातील विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी व मेडिकलला प्रवेश मिळण्यासाठी मोठ्या संख्येने शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे महाविद्यालये ओस पडत आहेत. महाविद्यालयांच्या तासिकांना हजेरी न लावता, केवळ शिकवणी वर्गांवरच विद्यार्थी भर देत असल्याने, शहरातील हजारो विद्यार्थी ग्रामीण भागामधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे शहरातील कनिष्ठ महाविद्यालये ओस पडत आहेत. यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याची ओरड होत असल्याने, शिक्षण विभागाने अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश पद्धती लागू केली. गुणवत्तेच्या आधारावर सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, ही त्यामागची भूमिका आहे. परंतु, महाविद्यालयांमध्ये तासिका व उपस्थितीपासून सूट मिळाली पाहिजे, या उद्देशाने हजारो विद्यार्थी ग्रामीण भागाकडे आणि खासगी शिकवणी वर्गांकडे वळत असल्याचे चित्र प्रवेश गतवर्षीच्या प्रवेश संख्येवरून दिसून येते. (प्रतिनिधी)
गतवर्षी ४,७00 विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी अर्ज!
गतवर्षी अकरावी प्रवेशासाठी ४,७०० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी विज्ञान शाखेच्या ३,३०० जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदासुद्धा अकरावीची केंद्रीय पद्धतीने आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यंदा निकाल कसा लागतो, यावर विज्ञानसह इतर शाखांमध्ये किती प्रमाणात प्रवेश होतात. हे स्पष्ट होईल.