मिशन अॅडमिशन : शाळा प्रवेशासाठी पालकांची पायपीट, शाळांची मुजोरी वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:42 PM2019-04-12T12:42:53+5:302019-04-12T12:43:05+5:30
अकोला: मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी खासगी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची पायपीट सुरू झाली आहे.
अकोला: मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी खासगी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची पायपीट सुरू झाली आहे. पालक शाळांमध्ये चकरा घालत असून, शाळा पालकांना कोणतीही दाद देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुजोरी प्रचंड वाढली असून, यावर प्राथमिक शिक्षण विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे.
आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यात ९ एप्रिल रोजी पहिली सोडत झाली. यात पहिल्या टप्प्यात १८६५ जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांना प्रवेशासाठी ११ ते २६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे; परंतु अद्यापपर्यंतही एकाही विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात आला नाही. वंचित व दुर्बल घटक वगळता, इतर पालक वर्ग पाल्यांच्या प्रवेशासाठी अक्षरश: इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांच्या पायºया झिजवित आहे; परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर प्राथमिक शिक्षण विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे या शाळांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून, पालकांना भुलथापा देऊन त्यांना नुसतं शाळेत चकरा मारायला लावत आहेत. शाळांच्या या मुजोरीला पालक वैतागले आहेत. प्रवेश प्रक्रिया आटोपली असून, आता २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश द्यायचा आहे, असे सांगून शाळांमधून पालकांना हुसकावून लावले जात आहे. काही शाळांमध्ये तर पालकांचे शिक्षण, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न जाणून घेण्यासाठी अर्ज दिल्या जात आहेत. ज्या पालकाची आर्थिक स्थिती भक्कम असेल त्या पालकालाच प्रवेशासाठी आमंत्रित केल्या जात असल्याचेही प्रकार घडत आहेत. प्राथमिक शिक्षण विभाग मूग गिळून बसल्याने खासगी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांची मक्तेदारी वाढत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
शाळांना सुटी लागण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रिया!
उन्हाळ्याच्या सुटीत किंवा सुटी संपल्यानंतर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेस सुरुवात व्हायची; परंतु शाळांच्या परीक्षा संपण्याच्या अगोदर, शाळेला सुटी लागण्यापूर्वीच शहरातील काही शाळा प्रवेश प्रक्रिया राबवित आहेत. काही जागा राखीव करून पालकांकडून भरमसाठ डोनेशन उकळण्याचा बिझनेसच या शाळांनी सुरू करून शिक्षणाच्या बाजारीकरणाला प्रोत्साहन दिले आहे.
आधी ब्लड रिलेशनचे प्रवेश!
शहरातील काही नामांकित इंग्रजी व मराठी शाळांनी प्रवेशासाठी ब्लड रिलेशन नावाचा प्रकार सुरू केला असून, या ब्लड रिलेशन अंतर्गत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सख्ख्या भावंडांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी त्यांच्या पालकांकडून भरमसाठ डोनेशन व शुल्क वसूल केल्या जात आहे. ब्लड रिलेशन आणि २५ टक्के राखीव जागांचे कारण सांगून इतर पालकांची मात्र शाळांकडून बोळवण केल्या जात आहे.
इतर पाल्यांनी शिकूच नये का?
शहरातील नामांकित समजल्या जाणाºया शाळांनी प्रवेशाच्या नावाखाली बिझनेसच उघडला आहे. आधी आमच्या शाळेतील ब्लड रिलेशनचे प्रवेश द्यायचे आहे. असे सांगून पालकांना पळवून लावल्या जाते. त्यामुळे इतर पाल्यांनीच नामांकित व इंग्रजी शाळांनी शिकूच नये का? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे.
प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे. काही शाळांमध्ये सुरू असलेल्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाईल. त्या शाळांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
-वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक.