'मिशन बिगीन अगेन' : सम, विषम नियमाचा पहिल्याच दिवशी फज्जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 10:17 AM2020-06-06T10:17:00+5:302020-06-06T10:19:09+5:30
शुक्रवारी पहिल्याच दिवशी ‘पी वन-पी टू’ या नियमाचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्य शासनाने लॉकडाउनचे नियम शिथिल करून सुरू केलेल्या मिशन बिगीन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वच दुकाने सुरू करण्याची मुभा दिली; परंतु कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाला काही अधिकार दिले आहेत. त्यानुसार अकोला शहरात सम आणि विषम पद्धतीने (पी वन-पी टू) दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले होते. या निर्देशानुसार महापालिकने नियोजनही केले; मात्र शुक्रवारी पहिल्याच दिवशी ‘पी वन-पी टू’ या नियमाचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.
शुक्रवारपासून बाजारपेठेतील रस्त्याच्या एका बाजूस असलेली दुकाने सम तारखेस व दुसºया बाजूला असलेली दुकाने विषम तारखेस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे; परंतु ‘पी वन-पी टू’बाबत किराणा दुकानदार, होलसेल किराणा व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायमच होता. तो शुक्रवारी पहिल्याच दिवशी प्रत्यक्षात दिसला. शहरातील सर्वच रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने उघडी होती.
७३ दिवसांनंतर गजबजली बाजारपेठ
कोरोनाचे संकट संपलेले नसतानाच कोरोनाच्या छायेत तब्बल ७३ दिवसानंतर दुकाने उघडली. अनेक व्यावसायिकांनी दुकानांच्या शटरचे सॅनिटायझेशन करून घेतले. दुकाने उघडल्यावर सर्वत्र आधी साफसफाई करताना ग्राहकांची काळजी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
ग्राहकांना पाहून दुकानदार सुखावले
ठप्प झालेला व्यवसाय पुन्हा रुळावर येणार की नाही, या चिंतेत असलेल्या व्यापाºयांना बाजारपेठेतील ग्राहकांची गर्दी पाहून दिलासा मिळाला. दुकानात आलेल्या ग्रहकांना पाहून दुकानदार सुखावल्याचे चित्र बाजापेठेत होते.
हे निर्बंध कायमच!
पी-1 व पी-2 लाइनमधील पान, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारी आस्थापना, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, बार (मद्यगृहे) प्रेक्षक गृहे, मंगल कार्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉजिंग, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कटिंगची दुकाने, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, टी-स्टॉल बंद राहतील.
शहरामध्ये कापड, फळे, भाजीपाला इत्यादी किरकोळ फेरीवाले, व्यावसायिकांना रस्त्याच्या कडेला बसून व एकाच जागी थांबून व्यवसाय करता येणार नाही.
दूध डेअरी व दूध विक्री वगळता किराणा, मेडिकल, फळे, भाजीपाला, बेकरी, डेली निड्स विक्रीची दुकाने आस्थापना हे सम-विषम दिनांकाप्रमाणेच सुरू राहतील.
येथे करा पार्किंग
बाजारपेठेतील पी-01 लाइन सुरू असल्यास पी-01 लाइनमधील दुकानासमोर पार्किंग करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त कापडणीस यांनी दिले आहे.
सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू-बंद करण्याच्या निर्णयाची सर्वांनी अंमलबजावणी करावी. तब्बल अडीच महिन्यांनंतर बाजारपेठ खुली होत आहे. त्यामुळे शहराचे अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. शुक्रवारी पहिला दिवस असल्याने अनेक ठिकाणी दोन्ही बाजूची दुकाने उघडी दिसली; मात्र उद्यापासून प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, अशी सर्वांनाच विनंती आहे.
- रमाकांत खेतान,
अध्यक्ष किराणा मर्चंट असोसिएशन